मुंबई - आदिवासी संस्कृती ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अमूल्य ओळख - मंत्री छगन भुजबळ


‘नरहरी झिरवाळ यांनी आयोजित केलेल्या वनरंग–२०२६’मधून आदिवासी कला,परंपरा आणि संस्कृतीचे मनोहारी दर्शन- मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

मुंबई,नाशिक :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग–२०२६’ या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे,परंपरांचे आणि लोककलांचे प्रभावी दर्शन घडत आहे.आदिवासी समाज हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा मूलस्तंभ असून,हजारो वर्षांपासून निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या समाजाच्या जीवनपद्धतीत पर्यावरण संवर्धन, सामूहिकता,समता आणि बंधुभावाची मूल्ये रुजलेली आहेत. ‘वनरंग–२०२६’ हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नसून आदिवासी समाजाच्या गौरवशाली वारशाचा सन्मान करणारा उपक्रम आहे,असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न,औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे वनरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आयोजित सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ बोलत होते.या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,अभिनेत्री वर्षा उसगावकर,अभिनेत्री प्रिया बेर्डे,पद्मश्री राहीबाई पोपरे,पद्मश्री भिकल्या धिंडा,आमदार हिरामण खोसकर, मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर,माजी खासदार हिना गावित,अभिनेते भरत गणेशपुरे,‘हास्यजत्रा’फेम गौरव मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या कला,क्रीडा,सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जीवनगौरव पुरस्कार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन पी.आणि गिर्यारोहक अनिल वसावे यांना आदिवासी भूषण पुरस्कार,तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशन या संस्थेला आदिवासी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ‘नवरंग’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच आदिवासी कलादालन आणि साहित्य प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली.आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक कला,लोकसंगीत आणि विविध नृत्यप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.आदिवासी सांस्कृतिक कला आणि नृत्यांनी कार्यक्रमस्थळी अक्षरशः डोळ्यांची पारणे फेडली.यावेळी राज्यातील तसेच देशभरातील सर्व आदिवासी बांधव-भगिनींना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की,हा दिवस केवळ एका समाजाचा उत्सव नसून मानवजातीच्या सर्वात प्राचीन संस्कृतीचा,निसर्गाशी एकरूप झालेल्या जीवनपद्धतीचा आणि मानवी मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे.महाराष्ट्रातील वारली,भिल्ल,कोकणा,गोंड, महादेव कोळी,कातकरी,ठाकर, माडिया,कोलाम यांसह अनेक आदिवासी जमातींनी आपल्या भाषा,परंपरा,लोककला आणि सांस्कृतिक वारसा आजही जतन केला आहे.वारली चित्रकला आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. तारपा नृत्य,ढोल नृत्य,पारंपरिक लोकगीते,हस्तकला,औषधी वनस्पतींचे ज्ञान आणि सामूहिक जीवनपद्धती ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपत्तीची अमूल्य देणगी आहे.ही केवळ कला नाही,तर हजारो वर्षांच्या संस्कृतीचा जिवंत इतिहास आहे असे त्यांनी नमूद केले.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदानही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.धरती आबा बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध‘उलगुलान’ उभारून जल,जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. क्रांतिवीर तंट्या भिल यांनी अन्यायाविरुद्ध शौर्याने लढा दिला, तर राघोजी भांगरे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले.शंकरशहा, रघुनाथशहा आणि गोविंद गुरु यांसारख्या महान व्यक्तींनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, सामाजिक जागृती आणि स्वातंत्र्याची चेतना निर्माण केली. अनेक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक आणि सक्षम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.याच ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजींनी‘भारत छोडो’आंदोलनाची घोषणा केली. ‘करेंगे या मरेंगे’या घोषणेने संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पेटून उठला.या आंदोलनात आदिवासी समाजानेही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य,स्वाभिमान आणि आदिवासी अस्मिता यांचे प्रतीक ठरतो,असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदींना बळ दिले. संविधानातील पाचवी अनुसूची,वनहक्क कायदा आणि पेसा कायदा यांसारख्या तरतुदींमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांना संरक्षण आणि बळकटी मिळाली आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी वंचित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले, तर राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची चळवळ उभी केली. या समाजसुधारकांच्या कार्यामुळे वंचित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवी दिशा निर्माण झाली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.आज आदिवासी समाजातील युवक-युवती शिक्षण,प्रशासन, उद्योग,कला,क्रीडा,विज्ञान अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.कविता राऊत – ‘सावरपाडा एक्सप्रेस’,तसेच दिलीप महादू गावित यांसारख्या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वातून आदिवासी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.दिलीप महादू गावित यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.त्याचप्रमाणे मेरी कोम,जयपाल सिंग मुंडा,दिलीप तिरकी,बायचुंग भुतिया अशा आदिवासी समाजातील अनेक भारतीय खेळाडूंसह नाशिक जिल्ह्यातील ताई बामणे,अंजना ठमके यांसारख्या आदिवासी समाजातून पुढे आलेल्या अनेक क्रीडापटूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जिद्दीच्या व कष्टाच्या जोरावर महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.आज विकासाच्या नव्या युगात आदिवासी समाज वेगाने प्रगती करत आहे.मात्र विकासाच्या प्रवासात आपल्या संस्कृतीची मुळे विसरून चालणार नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतानाच आपली भाषा,लोककला,परंपरा, लोकज्ञान आणि सांस्कृतिक ओळख जपणे ही काळाची गरज आहे.आदिवासी समाजातील तरुणांनी शिक्षण,संशोधन, उद्योजकता आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे. त्याचबरोबर पूर्वजांनी दिलेला निसर्गप्रेम, सामूहिकता,समता आणि पर्यावरण संरक्षणाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारीही स्वीकारावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.‘वनरंग–२०२६’सारखे उपक्रम आदिवासी समाजाला आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांशी जोडतात,समाजासमोर त्यांच्या कलेचा आणि परंपरेचा परिचय करून देतात आणि आदिवासी समाजाच्या योगदानाचा सन्मान वाढवतात.अशा उपक्रमांमुळे सामाजिक समता,बंधुभाव, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ होईल,असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.तसेच जल,जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करताना आदिवासी संस्कृतीचा सन्मान करूया आणि सर्वसमावेशक,समताधिष्ठित व पर्यावरणपूरक महाराष्ट्र तसेच भारत घडविण्याचा संकल्प करूया,असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या