नाशिक :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री थरारक छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ५ सदस्यांना रंगेहाथ अटक केली असून,त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या खऱ्या नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांच्या बंगल्यात काही संशयित इसम बनावट नोटा तयार करत होते.या माहितीची खातरजमा करून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या संयुक्त पथकाने फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन थेट बंगल्यावर छापा टाकला.या छाप्यात सं.आरोपीत बनावट नोटा छापताना रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
५ आरोपी गजाआड:
या कारवाईत पोलिसांनी खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे:
१)अमरेश्वर सुधाकर आईंथा (वय ३७, रा. हैदराबाद, तेलंगणा)
२)दासहरी प्रसाद सत्यई (वय ३६, रा. जि. सिरसाला,तेलंगणा)
३)गोकुळ आनंदराव दाते (वय ५६, रा. गंगापूर रोड, नाशिक)
४)हिरामण पुंजा दाते (वय ५६, रा. तळेगाव, त्र्यंबकेश्वर)
५)मच्छिंद्र भगवान घनदाट (रा. सातपूर, नाशिक)पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण १२,१९,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये ९,७५,००० रुपयांची रोकड (५०० रुपयांच्या १९५० खऱ्या नोटा), नोटांच्या आकाराचे कोऱ्या कागदांचे बंडल,नोटा छापण्यासाठी लागणारे केमिकल,छपाईची साधनसामुग्री,मोबाईल फोन्स आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.हे आरोपीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी केमिकलचा वापर करून खऱ्या ५०० रुपयांच्या नोटेवरून हुबेहूब ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करत होते.याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७८, १८०, १८१, १८२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
0 टिप्पण्या