उपमुख्यमंत्र्यांकडून बारामती तालुक्यातील विकासकामांची पाहणी
बारामती :- श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधावा.मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत,अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिल्या.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व.अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली.श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,मंदिराच्या जिर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसारच करण्यात यावीत. मंदिर परिसर आणि गाभाऱ्यातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल,याची दक्षता घ्यावी.विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवावा.विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या,कामांमध्ये हलगर्जीपणा किंवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.निकृष्ट अथवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल,याची संबंधितांनी नोंद घ्यावी.मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मेडद येथील स्व.अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. महाविद्यालय परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व निवासाच्या सुविधांचा विचार करून महाविद्यालय आणि वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,वसतिगृह तसेच परिसरातील विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. तत्पूर्वी,त्यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे,पंचायत समिती सभापती किरण तावरे,जिल्हा परिषद सदस्या रोहणी कदम (ढोले),नगराध्यक्ष सचिन सातव,पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किरण माने,मुख्याधिकारी पंकज भुसे,स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनिल काळे,मोरगाव देवस्थानचे विश्वस्त देवराज डहाळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या