नाशिक - दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा; महापौर हिमगौरी आहेर आडके,यांच्या हस्ते पाईपलाईन कामाचे भूमिपूजन



पाथर्डी-गौळाणे येथील दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय;भर पावसात महापौर हिमगौरीताई आहेर-आडके यांच्या हस्ते भुयारी गटार (दूषित पाणी डायव्हर्जन) पाईपलाईनचे भूमिपूजन

नाशिक, दि. २१ जुलै :
नाशिक महानगरपालिकेच्या 'प्रभाग पाहणी दौरा' उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील विविध विकासकामांची पाहणी करत असताना महापौर सौ. हिमगौरीताई आहेर-आडके यांनी पाथर्डी-गौळाणे येथील कचरा डेपोला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दूषित पाण्याच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी कचरा डेपोमधून बाहेर पडणारे दूषित व विषारी पाणी शेतीमध्ये मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली.

स्थानिकांच्या मते,कचरा डेपोमधून बाहेर पडणारे लिचेट (Leachate) स्वरूपातील दूषित पाणी शेतजमिनीत झिरपून भूजलामध्ये मिसळत असल्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होत असून शेतीची सुपीकता कमी होत आहे.परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.या समस्येची गांभीर्याने दखल घेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.तांत्रिक पाहणीनंतर या दूषित पाण्याचे भुयारी गटाराद्वारे (डायव्हर्जन पाईपलाईन) थेट एसटीपी (Sewage Treatment Plant) कडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे दूषित पाणी जमिनीत मुरणार नाही तसेच भूजल व शेतीचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भर पावसात पाथर्डी-गौळाणे येथे या दूषित पाणी डायव्हर्जन प्रकल्पाच्या पाईपलाईनचे भूमिपूजन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या की,"शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचे संरक्षण ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.दूषित पाण्यामुळे शेतजमीन,भूजल आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असून हा प्रकल्प त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.भविष्यातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिले जाईल."असेही महापौर यावेळी म्हणाल्या.या भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी नवीन नाशिक प्रभाग समिती सभापती बाळकृष्ण शिरसाट,भाजपा गटनेते शाम बडोदे,नगरसेवक भगवान दोंदे,शिवसेना उ.बा.ठा.पक्षाचे गटनेते केशव पोरजे,नगरसेविका वैशाली दळवी,नगरसेविका माधुरी डेमसे,भाजपा शहर सरचिटणीस रश्मीताई हिरे,विनोद दळवी,मदन डेमसे,तसेच परिसरातील शेतकरी बांधव,नागरिक,संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भर पावसातही जनतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी,प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून,अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दूषित पाण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या