आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखांहून अधिक नागरिकांशी जनसंवाद
मुंबई :- राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे.आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील,अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,असेही त्यांनी सांगितले.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती,जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला.आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.या संवादात आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का,डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का,डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.आरोग्य व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे,असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल.स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार,सकस आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार,असेही त्यांनी सांगितले.माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची सूचना केली.तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा,असेही त्यांनी सुचविले.या सूचनांना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवून आरोग्य सेवांमधील अडचणी समजून घेणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न राहील,असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल,माजी मंत्री आ. मुनगंटीवार,आ.प्रकाश सोळंके,सुरेश धस,दौलत दरोडा, किसन कथोरे,विनोद निकोले, प्रवीण स्वामी,राजू तोडसाम,उमेश ऊर्फ चंदू यावलकर,प्रवीण तायडे, डॉ.मिलिंद नरोटे,नितीन पवार, विविध ठिकाणचे नगराध्यक्ष, आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व सदस्य,प्रधान सचिव डॉ.निपुण विनायक,सचिव ई.रविंद्रन, अभियान संचालक संजय काटकर, आयुक्त,(शहरी आरोग्य)डॉ.सुनील भोकरे,संचालक डॉ.विजय कंदेवाड,सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत,उपसंचालक डॉ.दिलीप माने,तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
0 टिप्पण्या