ज्येष्ठ साहित्यिक,कलाकारांनी अर्ज सादर करावेत
नाशिक,दि.२४ :- राजर्षि शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en) १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ (ग्रामपंचायत) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
या योजनेच्या लाभासाठी संपूर्णपणे कला,साहित्य या क्षेत्राशी निगडित असलेल्या व त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे,अशा कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येते.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रता अशी : ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे.दिव्यांगांना वयाची अट १० वर्षे शिथिल राहील.कला व साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान असावे.साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातलेली असावी, वयाने ज्येष्ठ,विधवा,परितक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल.कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते,मात्र सध्या त्यांना अन्य कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही,असे कलाकार.केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार.कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. वरीलप्रमाणे पात्रताधारक लाभार्थ्यांनी अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या