(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक:-महानगरपालिकेच्या‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत आज,रविवार दि.२८ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आलेली‘कपिला नदी स्वच्छता मोहीम’नागरिक,लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी कर्मचारी,स्वयंसेवी संस्था,विद्यार्थी,सामाजिक संघटना व स्वयंसेवक यांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाली.
या मोहिमेचे उद्घाटन गिरीश महाजन,जलसंपदा, कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छ,सुंदर व हरित नाशिक घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या मोहिमेस महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नाशिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री (भा.प्र.से.),अतिरिक्त आयुक्त अमित रंजन (भा.प्र.से.),पंचवटी विभाग सभापती रोहिणी पिंगळे,नगरसेवक गौरव गोवर्धने,प्रियंका माने,जुई शिंदे,अदिती पांडे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,तसेच महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.याशिवाय विविध शासकीय विभागांचे अधिकारी,स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना,पर्यावरणप्रेमी नागरिक,विद्यार्थी व स्वयंसेवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अभियान यशस्वी केले.
महानगरपालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार के.के.वाघ कृषी महाविद्यालय,सरस्वती नगर,साई नगर व जनार्दन स्वामी मठ परिसर या तीन ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मोहिमेदरम्यान नदीपात्र व नदीकिनारी साचलेला प्लास्टिक,घनकचरा,निर्माल्य,गाळ तसेच इतर टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या.स्वच्छता कार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व वाहनांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. घनकचरा व्यवस्थापन,बांधकाम, अग्निशमन,आरोग्य,उद्यान,शिक्षण, जनसंपर्क तसेच इतर सर्व विभागांनी समन्वयाने आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून अभियान यशस्वी केले.
मोहिमेदरम्यान कपिला नदीपात्र व परिसरातून एकूण 23.105 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला असून,सदर कचरा महानगरपालिकेच्या खत प्रकल्पाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान आयुक्त मनीषा खत्री,यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार विनापरवाना ३ टन बांधकाम व पाडकामातील मलबा (Debris) टाकल्याप्रकरणी रु. २४,०००/-, सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य टाकल्याबद्दल रु. ५,०००/-, रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल रु. १८०/-, मोकळ्या जागेत बांधकाम व पाडकामातील (C&D) मलबा टाकल्याप्रकरणी रु. १०,०००/- तसेच विनापरवाना C&D (डेब्रिज) कचरा टाकल्याप्रकरणी रु. ८,०००/- असा एकूण ५ प्रकरणांमध्ये रु. ४७,१८०/- इतका दंड आकारण्यात आला.
याशिवाय,घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात राबविण्यात आलेल्या नियमित दंडात्मक कारवाईअंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याप्रकरणी ४ प्रकरणांमध्ये रु. १,२००/- व एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी १ प्रकरणात रु. ५,०००/- असा एकूण ५ प्रकरणांमध्ये रु. ६,२००/- इतका दंड आकारण्यात आला.अशाप्रकारे विशेष व नियमित कारवाई मिळून एकूण १० प्रकरणांमध्ये रु. ५३,३८०/- इतका दंड वसूल करण्यात आला.शहरात सार्वजनिक ठिकाणी अथवा उघड्यावर बांधकाम व पाडकामातील (C&D/डेब्रिज) कचरा टाकणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत यापुढेही अशाच प्रकारे कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून,नागरिकांनी C&D कचरा केवळ महानगरपालिकेच्या नियमानुसार व अधिकृत ठिकाणीच टाकावा.अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना नद्या, नाले व सार्वजनिक ठिकाणी कचरा, निर्माल्य तसेच बांधकामातील मलबा टाकू नये,पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता उपक्रमात सातत्याने सहभागी व्हावे,असे आवाहन केले.उन्नत नाशिक अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या या लोकसहभागातून कपिला नदी परिसर अधिक स्वच्छ,सुंदर व पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून,भविष्यातही अशा स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 टिप्पण्या