इंधन बचतीचा संदेश देत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केला बसने प्रवास
नाशिक, दि. ४ :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीला गती देण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील रस्ते,वाहतूक व्यवस्थापन,पार्किंग आणि भाविकांच्या थांब्यासाठीच्या सुविधांचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बुधवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) डॉ.डी.एस.स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे,एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले प्रामुख्याने सहभागी झाले होते.
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा 'एसटी' बसमधून सामूहिक प्रवास शासनाच्या इंधन बचतीच्या सूचनांचे पालन करत आणि एक संदेश देत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापली स्वतंत्र शासकीय वाहने वापरण्याऐवजी सामूहिक वाहनाचा (Carpooling) निर्णय घेतला.सर्व अधिकारी एकाच बसमधून एकत्र प्रवास करत पाहणीसाठी निघाले. या प्रयोगामुळे इंधन आणि वेळेची बचत तर झालीच,पण कुंभमेळ्यात चालवल्या जाणाऱ्या शटल बसच्या दृष्टीने रस्त्यांची रुंदी, अवघड वळणे, चढ-उतार आणि उंचीची मर्यादा यांसारख्या तांत्रिक बाबींची अधिकाऱ्यांना बसमध्ये बसूनच थेट जागेवर खात्री करता आली.
क्षेत्र क्रमांक १ (Sector-1) मधील नियोजन
कुंभमेळा सुरक्षित करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण परिसराचे ३ भागांमध्ये (सेक्टर) विभाजन केले आहे. यात घोटी आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचा दक्षिण भाग 'सेक्टर १' मध्ये येतो. आजचा दौरा याच भागावर केंद्रित होता.हा पाहणी दौरा सकाळी ६ वाजता घोटी रेल्वे स्थानक परिसरातून सुरू झाला आणि विविध तांत्रिक बाबींची नोंद घेत सकाळी १०:१५ वाजता नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका खासगी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ संपला.
विमानतळाच्या धर्तीवर 'होल्डिंग एरिया'आणि आधुनिक सुविधा
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गाखाली तसेच घोटी-त्र्यंबकेश्वर परिसरात 'होल्डिंग एरिया'(भाविकांना थांबण्याची ठिकाणे) तयार केले जाणार आहेत. विमानतळावरील नियंत्रित व्यवस्थेप्रमाणे भाविक आणि वाहनांची हालचाल सुरळीत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.जेणेकरून मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही.या होल्डिंग एरियामध्ये भाविकांसाठी स्वच्छतागृहे,पाणी, वीज, सार्वजनिक सूचना प्रणाली, ई-वाहनांसाठी'ईव्ही चार्जिंग स्टेशन'अंतर्गत रस्ते,पार्किंग व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
शटल बस सेवा,जंक्शन्स आणि व्हॅलेट पार्किंग
भाविकांच्या सोयीसाठी मुख्य पार्किंग क्षेत्रांमधून स्वतंत्र'शटल बस सेवा'चालविली जाईल.यासाठी तात्पुरते बस डेपो,दुरुस्ती केंद्रे चालकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याबाबत चर्चा झाली. रस्त्यांची दुरुस्ती,रुंदीकरण आणि अतिक्रमण काढण्याबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले. वाहतूक सतत चालू राहण्यासाठी प्रमुख चौकांचे (जंक्शन्स) नवीन नियोजन केले जाणार असून, अंतर्गत रस्ते बळकट करून ते एकमार्गी (One Way) म्हणून वापरले जातील. तसेच पार्किंग व्यवस्थेत ‘व्हॅलेट पार्किंग’चा पर्याय आणि समाजातील तृतीयपंथी घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन सकारात्मक विचार करत आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.
सिंहस्थ नियोजनात सामाजिक समावेशकतेवर भर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सामाजिक समावेशकतेला प्राधान्य देत समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबविणार असून,विशेषतः तृतीयपंथी व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेमध्ये‘व्हॅलेट पार्किंग’सारख्या आधुनिक सुविधांचाही समावेश करण्याचा प्रशासनाचा विचार असून,यामुळे भाविकांना अधिक सुकर आणि सुसंघटित सेवा उपलब्ध होणार आहे.
अंतिम आराखडा कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर होणार
या पाहणीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून 'सेक्टर क्रमांक १'चा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये अग्निशमन, आरोग्य,पाणीपुरवठा,वीज आणि स्वच्छतेच्या सुविधांचे नियोजन असेल.आगामी जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर हा अंतिम आराखडा आणि निधीची मागणी मंजुरीसाठी 'सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे' सादर केली जाईल. त्यानंतर सेक्टर २ आणि ३ च्या नियोजनाला सुरुवात होईल. त्यानंतर अंतिम आराखडा कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल,असे यावेळी सांगण्यात आले.
0 टिप्पण्या