नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलचा फज्जा; शहराच्या 'प्रथम नागरिका'चा अवमान?


नाशिक :- राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वाचनालयाच्या विस्तारित वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.या पत्रिकेत नाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर-आडके,यांचे नाव 'प्रमुख उपस्थिती'च्या यादीत खासदार आणि आमदारांच्याही शेवटी टाकण्यात आल्याने शासकीय शिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) सरळ-सरळ उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.शासकीय नियमांनुसार,शहराच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक किंवा अधिकृत कार्यक्रमात स्थानिक महापौरांना खासदार आणि आमदारांपेक्षा वरचे स्थान व अग्रक्रम देणे बंधनकारक असते.मात्र,या पत्रिकेत सर्व आमदारांची आणि खासदारांची नावे आधी छापून महापौरांचे नाव सर्वात शेवटी टाकण्यात आले आहे. हा थेट शहराच्या प्रथम नागरिकाचा आणि पदाचा अवमान असल्याच्या भावना नागरिक व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत.काही शासकीय,खाजगी किंवा निम-शासकीय संस्थांकडून अशा मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करताना प्रोटोकॉलचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याबद्दल आता संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या