नाशिक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- चारित्र्याच्या संशयावरून स्वतःच्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १० हजार रुपये दंडाची ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी आज हा ऐतिहासिक निकाल दिला.
लहाणु मोतीराम धोंगडे (वय ३०, रा.चाफ्याचा पाडा,ता.दिंडोरी,जि. नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.काय आहे संपूर्ण घटना?
ही थरारक घटना २१ एप्रिल २०२२ रोजी पहाटे ५:३० ते ६:०० वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील चाफ्याचा पाडा येथे घडली होती. आरोपी लहाणु धोंगडे,हा आपली पत्नी नंदाबाई धोंगडे हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. घटनेच्या दिवशी याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने घरात असलेली कुऱ्हाड काढून पत्नी नंदाबाई यांच्या मानेवर आणि डोक्यावर सपासप वार केले.या गंभीर हल्ल्यात नंदाबाई यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी भक्कम तपास आणि पाठपुरावा केला.
वणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ खेडकर,यांनी या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने तपास केला. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.सरकारी वकील शिरीष कडवे,यांनी सरकार पक्षातर्फे मजबूत युक्तिवाद केला,तर पैरवी अंमलदार पोलीस हवालदार अमोल आहेर,यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच,नाशिक ग्रामीणच्या गुन्हे दोषसिद्धी शाखेच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा गावीत,पोलीस उपनिरीक्षक आर. एस.मुन्तोडे,महिला पोलीस अंमलदार कविता भोर आणि अश्विनी परदेशी यांनी कायदेशीर मार्गदर्शन करत गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी मोलाचा पाठपुरावा केला.

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
पोलीसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.पोलीस आणि कायदेशीर पथकाने केलेल्या या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम.यांनी तपास अधिकारी,सरकारी वकील आणि दोषसिद्धी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या