मातेश्वरी जगदंबा स्मृती दिवस मोठ्या स्नेहभावाने साजरा
नाशिक :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रथम संचालिका मातेश्वरी जगदंबा यांचा स्मृतिदिन (२४ जून) कलानगर, म्हसरूळ येथील 'प्रभू प्रासाद' या ब्रह्माकुमारी सभागृहात मोठ्या स्नेहभावाने संपन्न झाला. याप्रसंगी उपक्षेत्रीय मुख्य संचालिका आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी ब्रह्माकुमारी साधकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.वासंती दीदीजी म्हणाल्या, "मातोश्री जगदंबा (मम्मा) या आपल्यासमोर एक आदर्श मूर्ती आहेत. आपण सर्वांनीसुद्धा त्यांच्यासारखेच स्वरूप धारण करणे गरजेचे आहे. लक्ष्मी, जगदंबा, दुर्गा आणि सरस्वती या सर्व देवींच्या गुणांना धारण करून मम्मांनी कधी शक्ती स्वरूप,कधी स्नेह स्वरूप,कधी साधेपणा,तर कधी निश्चय स्वरूपाचे दर्शन घडविले.ब्रह्मा बाबांनी ईश्वरीय कार्यात आपली सर्व संपत्ती समर्पित केली होती.मात्र,मम्मा एक कन्या असल्याने त्यांच्या नावे कोणतीही धनसंपदा नव्हती.त्यांनी पैशांचे कोणतेही योगदान दिले नसले,तरी त्यांचे तन आणि मन यांचे समर्पण अद्भूत होते.त्यांच्या याच सेवाभावामुळे त्या भविष्यातील 'लक्ष्मी' पदास प्राप्त झाल्या." आपल्यासमोर जेव्हा अनेक संकटे व प्रश्न उभे राहतात,अशा वेळी मम्मांचे जीवनदर्शन आपल्याला योग्य प्रेरणा देते, असेही त्यांनी नमूद केले.
दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मातेश्वरी जगदंबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.नाशिक शाखेच्या कार्यक्षेत्रातील विविध सेवा केंद्रे, उपसेवा केंद्रे व ब्रह्माकुमारी पाठशाळेच्या संचालक वर्गाच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. याप्रसंगी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी,पुनम दीदी,मंगल दीदी आदी समर्पित भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
ध्यानयोगाचे आयोजन
२४ जून १९६५ रोजी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी मातेश्वरी जगदंबा यांनी आपली साकार काया त्यागून इहलोकाचा निरोप घेतला होता.त्यांच्या २८ वर्षांच्या ईश्वरीय सेवाकाळात त्यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येक साधकाला ईश्वरीय शक्तीने ओतप्रोत केले.या जगतमातेच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा केंद्रावर विशेष ध्यानयोगाचे (राजयोग) आयोजन करण्यात आले होते.मम्मांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी या कार्यक्रमात नाशिकमधील ब्रह्माकुमारी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या