जनभागीदारी अभियानाचा प्रारंभग्रामपंचायत रणखेडा अंतर्गत रामवाडी येथे संतृप्ती शिबिर



नाशिक :-  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM-JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यात जनभागीदारी अभियानास प्रारंभ झाला असून, या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या लाभार्थी संतृप्ती शिबिरांचा अनुसूचित जमातीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण,डॉ. कश्मिरा संखे  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या अभियानांतर्गत 21 मे 2026 रोजी ग्रामपंचायत रणखेडा अंतर्गत रामवाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे लाभार्थी संतृप्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कळवणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर,नांदगावचे नायब तहसीलदार कु-हे, महाजन,ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.निरभवणे,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (MSRLM) चे गट व्यवस्थापक भदाणे,महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी,यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये आदिवासी विकास, महसूल, आरोग्य, महिला व बाल विकास, पोषण आहार तसेच महिला बचत गटांशी संबंधित विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील सुमारे 150 ते 200 आदिवासी नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला. यावेळी आदिसेवा केंद्रामार्फत आयोजित जनसुनावणीमध्ये नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कातकरी, ठाकर व भिल्ल समाजातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

राज्यातील आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय विभाग व मंत्रालयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभिसरण पद्धतीने अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांचा प्रचार, प्रसार व लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानामध्ये समाविष्ट गावांमध्ये  22 ते 25 मे 2026 या कालावधीत आयईसी (IEC) लाभार्थी संतृप्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरांमध्ये अनुसूचित जमातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. संखे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या