ड्रीम कॅसल चौक ते मखमलाबाद रस्ते कामांना गती द्या; आयुक्त मनीषा खत्री यांचे कडक निर्देश

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विकासकामांनी वेग घेतला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रभाग क्रमांक ६ मधील ड्रीम कॅसल चौक ते मखमलाबाद या मुख्य रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी खराब रस्त्यांचे पॅचवर्क आणि दुरुस्तीची कामे ३० मेपर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.

३० मेपर्यंत दुरुस्ती, तर ३० जूनपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला
पावसाळ्यात नागरिकांना चिखल आणि खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी आयुक्तांनी कामाची मुदत निश्चित केली आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करून ती बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यामुळे पावसाळ्यात मुख्य रस्त्यावरील (कॅरेजवे) कामाला गती मिळेल आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.
आयुक्त मनीषा खत्री यांचा पायी फेरफटका मारून कामाची बारकाईने पाहणी

आयुक्तांनी ड्रीम कॅसल परिसरापासून संपूर्ण मार्गावर पायी फेरफटका मारला. यावेळी त्यांनी रस्त्याची सद्यस्थिती,खराब झालेले भाग आणि तातडीने दुरुस्तीची गरज असलेल्या पॅचेसची पाहणी केली. या मार्गावर सध्या भूमिगत पाणीवाहिनी, ड्रेनेज, विद्युत वाहिनी आणि पावसाळी जलनिस्सारण वाहिनी अशी अनेक 'युटिलिटी' कामे समांतरपणे सुरू आहेत. ही सर्व कामे भविष्यातील रस्ते बांधणीचा विचार करून समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

भविष्यातील गरजा आणि ३० मीटर रुंदीकरण
विकास आराखड्यानुसार हा रस्ता ३० मीटर रुंद प्रस्तावित आहे. भविष्यातील वाढती वाहतूक आणि सिंहस्थ काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा मार्ग अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.रस्ता रुंदीकरणामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.प्रशासन कामासाठी कटिबद्ध
या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी अधिकारी आणि ठेकेदारांशी संवाद साधला. "पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती आणि युटिलिटी समन्वय साधून कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.प्रशासन ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे,"असे आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या