(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
सिन्नर नाशिक :- सिन्नर शहर आणि परिसरात पायी चालणाऱ्या महिलांना लक्ष करून गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर,यांच्या विवाह सोहळ्यात झालेल्या ६ तोळे सोन्याच्या पोत चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ३ मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.या कारवाईत पोलिसांनी २९ वर्षीय संशयित आरोपीताला अटक केली असून,त्याच्याकडून ४ लाख ५९ हजार ५३४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,११ मे २०२६ रोजी घोरवड (ता. सिन्नर) येथील 'आशिर्वाद लॉन्स' येथे महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा विवाह सोहळा पार पडला.हा सोहळा आटोपून रात्री १० वाजेच्या सुमारास घराकडे जाण्यासाठी शिर्डी-घोटी हायवे रोड क्रॉस करणाऱ्या एका महिला नातेवाईकाला दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गाठले.संशयितांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल ६ तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून धूम ठोकली होती.याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे दुवा चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे,यांनी गुन्हे शोध पथकाला तपासकामी रवाना केले होते.पथकातील अंमलदारांनी फिर्यादी महिला व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून आणि परिसरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी केली.तपासादरम्यान रेकॉर्डवरील संशयित आरोपी अनिल सुभाष चिंतामणी (वय २९, रा.वडाळामहादेव,ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) याचे नाव समोर आले.पोलिसांनी श्रीरामपूरमधील अशोकनगर भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
साथीदाराच्या मदतीने नाशिक, सिन्नर,शिर्डीत चोऱ्या
पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपीत अनिल चिंतामणी,याने आपला साथीदार प्रकाश गोनके (रा. उभाडे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. हे दोघे मोटारसायकलवरून सिन्नर शहर,घोरवड आणि शिर्डी परिसरामध्ये फिरून पायी जाणाऱ्या महिलांची टेहळणी करायचे आणि संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पसार व्हायचे. ३ गुन्ह्यांची कबुली; साडेचार लाखांचे सोने जप्त
सं.आरोपीतांने चौकशीत खालील तीन गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे:
१) सिन्नर पोलीस ठाणे - गु.र.नं. ३६५/२०२६ (BNS ३०४(२), ३(५))
२) सिन्नर पोलीस ठाणे - गु.र.नं. ३९८/२०२६ (BNS ३०४(२), ३(५)
३) शिर्डी पोलीस ठाणे (जि. अहिल्यानगर) - गु.र.नं. ५१७/२०२६ (BNS ३०४(२), ३(५))अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीवर यापूर्वीही अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी आरोपीकडून ३८.०७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि सोन्याची लगड असा एकूण ४,५९,५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक विमला एस.आणि उपविभागीय पोलीस अधिकारी क्रांतीलाल पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सिन्नरचे पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे,यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे,आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे,आणि प्रशांत सहाणे,यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली.या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा राऊत, करत आहेत.
0 टिप्पण्या