सारुळ शिवारात बेकायदेशीर दगड उत्खनन; सहा जणांवर वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल


नाशिक :- विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन करून सरकारचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या सहा संशयितांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारुळ शिवारात अनधिकृतपणे दगड खाण चालवून १२० ब्रास दगडाची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
नाशिक तालुक्यातील सारुळ शिवार येथील खाणकाम गटात कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना दगड उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे तपास केला असता,संशयित आरोपीत सचिन गणपत नवले,धीरज रमेश भंडारी,राहुल प्रताप महाले,प्रमोद दाजी पाटील,बाळू गोविंद रहाडे आणि योगेश अमृतलाल बद्रीकिया यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमताने दगड उत्खनन केल्याचे समोर आले.
७२ हजारांची रॉयल्टी बुडवली
संशयितांनी कोणतीही रॉयल्टी (स्वामित्वधन) न भरता एकूण १२० ब्रास दगडाचे उत्खनन केले. यामुळे शासनाचे सुमारे ७२,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ग्राम महसूल अधिकारी अरुण दत्तात्रय फसाळे (वय ४६) यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपूर्वी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी ४ मे २०२६ रोजी दुपारी ४:१६ वाजता वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि खाण व खनिज अधिनियम १९५७ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी