देवळा तालुक्यातील खुंटेवाडी फाटा येथून शेतातील इलेक्ट्रिक मोटरची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


देवळा :- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खुंटेवाडी फाटा परिसरातून एका शेतकऱ्याची ५ हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक दादाजी भामरे (वय ६७, रा. शिवाजीनगर, खुंटेवाडी रोड, ता. देवळा) यांचे खुंटेवाडी फाटा परिसरात शेत गट नंबर ४१८ मध्ये शेत आहे. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान,अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील विहिरीतून सुमारे २० हजार रुपये किमतीची 'परफेक्ट' कंपनीची ५ हॉर्स पॉवरची लोखंडी इलेक्ट्रिक मोटर चोरून नेली.
आपली मोटर चोरीला गेल्याचे लक्षात येताच भामरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे (ब.नं. ३६१) करत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या साहित्याची चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या