पेठमध्ये किरकोळ वादातून हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


पेठ (नाशिक): शेतातील स्टार्टरची पेटी घरी आणल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत पती-पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील शिवशेत येथील फिर्यादी हेमराज गोविंद गवळी (४०) यांचा पुतण्या स्टार्टरची पेटी घेऊन आला होता. याच गोष्टीचा राग धरून आरोपींनी वाद उकरून काढला. फिर्यादीचा भाऊ आणि पुतणी यांना आरोपी मारहाण करत असताना, फिर्यादी हेमराज गवळी आणि त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले.
पती-पत्नीला बेदम मारहाण
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर आरोपींनी लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांच्याही डोक्यावर, पाठीवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या झटापटीत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रही तुटून गहाळ झाले आहे.
पोलीस कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी नंदराज गोविंद गवळी, सुनील नंदराज गवळी आणि जीवन नंदराज गवळी (सर्व राहणार शिवशेत, ता. पेठ) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९, ३५२, ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन. टी. गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या