विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित सुसंस्कृत सार्वजनिक परिसर भविष्यात नाशिकसाठी आदर्श ठरणारा उपक्रम - महापौर हिमगौरी आहेर आडके

नाशिक :-  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नाशिक महानगरपालिकेने वाहतूक आणि विकास धोरण संस्था, (Institute for Transportation and Development Policy) आयटीडीपी इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्याने शहरातील पहिल्या ‘सुरक्षित शाळा मार्ग’या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली असून शाळा परिसर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल आणि डॉन बॉस्को शाळा मार्ग येथे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम भविष्यात शहरातील सुमारे ३० शाळांपर्यंत टप्प्याटप्प्याने विस्तारला जाणार असून शाळा परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल आणि डॉन बॉस्को शाळा मार्गाची या प्रायोगिक उपक्रमासाठी निवड सखोल तांत्रिक अभ्यास आणि विविध निकषांच्या आधारे करण्यात आली.शहरातील विविध शाळांजवळील अपघातप्रवण क्षेत्रांचा भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी,वाहतुकीची घनता,स्थानिक परिस्थिती तसेच महानगरपालिकेच्या वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून डॉन बॉस्को शाळा मार्गाची निवड निश्चित करण्यात आली.या मार्गावर डॉन बॉस्को हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल या दोन प्रमुख शैक्षणिक संस्था असून सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज या परिसरात ये-जा करतात.याशिवाय अवघ्या चारशे मीटर परिसरात विविध क्रीडा सुविधा उपलब्ध असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान असे आढळून आले की,रस्त्याची पुरेशी रुंदी उपलब्ध असतानाही पदपथांवर अनियमितरीत्या उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते.आयटीडीपी इंडियाने केलेल्या वाहतूक अभ्यासात या परिसरातील काही वाहनांचा वेग ताशी सत्तर किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आला.तसेच वेगाने पुढे जाणाऱ्या वाहनांमुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले.या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन, पालक,विद्यार्थी,शालेय वाहनचालक, महानगरपालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्याशी चर्चा करून स्थानिक गरजा समजून घेत या उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला.
यामध्ये सुरक्षित पादचारी मार्गांची आवश्यकता,वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज,शाळा परिसरात नियोजित वाहन थांबा व्यवस्था तसेच शाळेच्या वेळेतील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्याची आवश्यकता प्रकर्षाने समोर आली.
या उपक्रमाअंतर्गत शाळा परिसरात पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत :
• स्पष्ट दर्शक चिन्हे आणि शाळा सुरक्षा क्षेत्र निश्चिती
• सुरक्षित पादचारी मार्गांची निर्मिती
• पदपथांवरील वाहन अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक खांब
• चौकांमध्ये सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा
• वाहनांचा वेग कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना
• विद्यार्थ्यांच्या चढ-उतारासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित वाहन व्यवस्था या प्रायोगिक उपक्रमाच्या परिणामांचे पुढील काही दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे. वाहनांचा वेग,विद्यार्थ्यांची हालचाल, वाहतुकीचा प्रवाह आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यशस्वी अंमलबजावणीनंतर शहरातील इतर शाळांमध्येही अशाच प्रकारचे सुरक्षित शाळा क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
यावेळी महापौर हिमगौरी आडके म्हणाल्या,“विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुसंस्कृत सार्वजनिक परिसर निर्माण करणे ही शहर विकासाची महत्त्वाची जबाबदारी आहे. हा उपक्रम भविष्यात नाशिकसाठी आदर्श ठरणारा उपक्रम असेल.”
“विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात सुरक्षितता सुनिश्चित करणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे.

योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून शाळा परिसर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.महापालिका आयुक्त मनीषा खत्री


“हा उपक्रम केवळ प्रायोगिक स्वरूपातील प्रकल्प नसून शहरातील शाळा परिसर अधिक सुरक्षित करण्यासाठी सुरू झालेल्या व्यापक आणि दीर्घकालीन प्रयत्नांची सुरुवात आहे.”अतिरिक्त आयुक्त अमित रंजन

“शाळा परिसरातील रस्ता सुरक्षा अधिक सक्षम करण्याची गरज सातत्याने जाणवत होती.या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थितीत उपाययोजनांची परिणामकारकता तपासून भविष्यात अधिक सक्षम आणि कायमस्वरूपी उपाय विकसित करता येतील.”प्रांजल कुलकर्णी, व्यवस्थापक आयटीडीपी इंडिया, 
नाशिक महानगरपालिकेच्या या पुढाकारातून शहरात सुरक्षित, सुयोग्य आणि नागरिकाभिमुख नागरी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या