मालेगाव जुन्या वादातून टोकाचे पाऊल; कुऱ्हाड आणि टॉमीने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक


मालेगाव (प्रतिनिधी):मालेगाव तालुक्यातील निमगाव शिवार परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि घराशेजारील झाड तोडण्याच्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी काफियाबानो नजमुद्दीन मन्सूरी (वय ४५, रा. निमगाव) यांचे आरोपींसोबत जुने वाद होते. १७ मे रोजी सकाळी ९:३० ते १० च्या सुमारास घराशेजारील झाड तोडण्याच्या कारणावरून हा वाद पुन्हा उफाळून आला.यावेळी आरोपींनी कुऱ्हाड काढून दहशत निर्माण केली.
आरोपी जाहीद सुभान मन्सूरी याने फिर्यादीचे पती नजमुद्दीन मन्सूरी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी टॉमीने डोक्यावर ३ ते ४ वार केले. या हल्ल्यात नजमुद्दीन हे गंभीर जखमी झाले आहेत. याचवेळी दुसरा आरोपी इरफान सुभान मन्सूरी याने फिर्यादीच्या दोन्ही मुलांना (आवेश आणि अरबाज) लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस कारवाई:
या गंभीर घटनेनंतर पीडित कुटुंबाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ११९(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक महाजन या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या