नाशिकमध्ये वृक्ष पुनर्रोपण उपक्रमाला चालना; पर्यावरणपूरक विकासावर भर - मंत्री गिरीश महाजन
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
नाशिक :- नाशिक शहरात विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “उन्नत नाशिक अभियान” अंतर्गत वृक्ष पुनर्रोपणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिकमध्येही विकासकामांमुळे स्थलांतरित करावी लागणारी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे झाडांना नवजीवन मिळण्यासोबत शहराच्या हरिततेतही भर पडणार आहे.
या बैठकीस महापौर हिमगौरी आडके आहेर, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,तसेच आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन आणि उद्योजक पुनित बालन उपस्थित होते.
शहरात आतापर्यंत सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापुढे नवीन वृक्ष लागवडीसोबतच विद्यमान झाडांचे जतन आणि पुनर्रोपण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. कोणत्या प्रजातींची झाडे सुरक्षितपणे स्थलांतरित करता येतील,याबाबत सखोल अभ्यास करण्यात येणार असून,यासाठी संबंधित संस्थांसोबत लवकरच करार केला जाणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनास जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या सूचना दिल्या असून या उपक्रमात सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल,असे नमूद केले.महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी वृक्ष पुनर्रोपण करताना प्रत्येक झाडाची काळजी रुग्णाप्रमाणे घेण्याचे निर्देश दिले.आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संवर्धन राखण्याचा हा प्रयत्न असून, नाशिकला हरित व पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा