(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- काल व परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह शहरातील विविध नद्या व नाल्यांना पूर आल्याने पंचवटीसह शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ,पाणवेली,दगड,लाकडे तसेच इतर कचरा साचला.पूराचे पाणी ओसरताच महापौर हिमगौरी आहेर आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुक्त मनीषा खत्री,यांच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पंचवटीसह शहरातील पूरग्रस्त व बाधित भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेंतर्गत रामकुंड परिसरातील मंदिरांमधील गाळ, पाणवेली व तत्सम कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून घाट परिसराची सखोल स्वच्छता करण्यात येत आहे.तसेच वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे म्हसोबा पटांगण व गौरी पटांगण येथे वाहून आलेला गाळ,दगड व इतर कचरा तीन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू असून अग्निशमन विभागाच्या वाहनामार्फत संबंधित परिसर धुण्यात येत आहे.याचबरोबर सातपूर विभागातील दादोबा पूल, सातपूर गाव स्मशानभूमी पूल तसेच इतर पुलांवर साचलेल्या पाणवेली,वाहून आलेला कचरा,लाकडे व इतर अडथळे हटवून घंटागाड्यांमार्फत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच सोमेश्वर धबधबा परिसरातील संरक्षक रेलिंगमध्ये अडकलेल्या पाणवेली व कचरा यंत्रसामग्री व मनुष्यबळाच्या सहाय्याने काढून घंटागाड्यांमार्फत उचलण्यात आला.याशिवाय शहरातील पूरग्रस्त व पावसामुळे प्रभावित झालेल्या इतर भागांमध्येही कचरा उचलणे, गाळ हटविणे,रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.
अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,यांच्या समन्वयाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.सदर मोहिमेदरम्यान आतापर्यंत १० टन ८६५ किलो पाणवेली व तत्सम कचरा संकलित करून खत प्रकल्पाकडे रवाना करण्यात आला आहे.शहरातील सर्व पूरग्रस्त व बाधित भागांची संपूर्ण स्वच्छता पूर्ण होईपर्यंत ही विशेष मोहीम अखंडपणे सुरू राहणार आहे.या विशेष स्वच्छता मोहिमेत नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक,सफाई कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समन्वयाने युद्धपातळीवर स्वच्छतेची कामे करीत आहेत.
0 टिप्पण्या