थकबाकीदारांना सुवर्णसंधी! नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून 'अभय योजना' द्वारका भुयारी मार्गाला वामनदादा कर्डक यांचे नाव देण्याची शिफारस

नाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय! १ डिसेंबरपासून मालमत्ता कर 'अभय योजना' लागू; द्वारका भुयारी मार्गाला वामनदादा कर्डक यांचे नाव देण्याची शिफारस

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये आज नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी बहुप्रतिक्षित 'अभय योजना' येत्या १ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.यासोबतच नाशिक द्वारका येथील भुयारी मार्गाला लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेवर शिफारस करण्यात आला आहे.यंदाच्या दिवाळीनिमित्त नाशिककरांना विकासाची आणि आनंदाची भेट देण्याचा प्रयत्न स्थायी समितीने केला आहे.आजच्या सभेत जादा विषयांसह सर्व विकासकामांचे विषय मंजूर करण्यात आले.महानगरपालिकेची थकबाकी कमी करणे आणि नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने अभय योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिली आहे.या निर्णयामुळे थकबाकीदार नागरिकांना शास्तीमध्ये मोठा दिलासा मिळणार असून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
• द्वारका भुयारी मार्गाला वामनदादा कर्डक यांचे नाव : नाशिक द्वारका येथील भुयारी मार्गाला लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी स्थायी समितीच्या वतीने महासभेवर शिफारस करण्यात आला आहे.
• मागासवर्गीय घटकांसाठी कल्याणकारी योजना : मागासवर्गीय समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगार व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी मिळाव्यात, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ व मोफत बसपासची सुविधा मिळावी,यासाठी मागासवर्गीय घटकातील निधीतून विविध कल्याणकारी योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
• सातपूर अपघात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश : सातपूर येथील अपघातास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर व इतर संबंधितांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले आहेत.महसूल वसुलीचा साप्ताहिक अहवाल : घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागामार्फत वसूल झालेल्या महसुलाचा सविस्तर लेखाजोखा दर्शवणारा साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रशिक्षण टेंडरची माहिती देण्याचे निर्देश : महिला व बालकल्याण विभागाच्या प्रशिक्षणाचे जे टेंडर दिलेले आहे,त्याची प्रभागनिहाय माहिती सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, असेही सभेत सांगण्यात आले."बेरोजगार तरुणांना रोजगार,विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा आणि करदात्यांना दिलासा देण्यासाठी स्थायी समिती कटिबद्ध आहे.असेही स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या