नाशिक महानगरपालिकेमार्फत छठपूजेच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ४ टन ७६० किलो निर्माल्य व तत्सम कचऱ्याचे संकलन; १२ व्यक्तींवर कारवाई करून ७,७८० रुपयांचा दंड वसूल
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- छठपूजा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी परिसरातील घाट व नदीकिनारील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेमार्फत एकूण ४ टन ७६० किलो निर्माल्य व तत्सम कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ७,७८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर  विलास शिंदे व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेमार्फत सदर स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

छठपूजा महोत्सवाच्या अनुषंगाने पंचवटी विभागातील गंगा घाट (रामकुंड),नांदूर घाट तसेच गोदावरी नदीलगतच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विभागीय अधिकारी  राहुल जाधव व घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या माध्यमातून आयोजक,भाविक व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहनांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे पूजेचे साहित्य व निर्माल्य नदीपात्रात न टाकता महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात जमा करावे, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच सार्वजनिक परिसरात कचरा टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या.

नाशिक महानगरपालिकेमार्फत वारंवार जनजागृती व सूचना देऊनही दिनांक १५ व १६ नोव्हेंबर रोजी घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यक्तींवर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ७,७८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

छठपूजा महोत्सव संपन्न झाल्यानंतर गोदावरी नदी परिसरात निर्माल्य व इतर कचरा साचून राहू नये, यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 'नमामि गंगे' या उपक्रमांतर्गत ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटच्या सहकार्याने होळकर पुलापासून टाळकुटेश्वरपर्यंतच्या नदीकिनारील विविध घाट व परिसरांमध्ये महानगरपालिकेमार्फत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या मोहिमेत लक्ष्मण कुंड,रामकुंड,निळकंठेश्वर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन तसेच नांदूर घाट या प्रमुख ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात आली. या परिसरातील निर्माल्य, पूजेचे साहित्य, फुले, हार व इतर तत्सम कचरा संकलित करून पुढील प्रक्रियेसाठी खत प्रकल्पावर पाठविण्यात आला.

सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वाहन क्रमांक MH15 KC 2405 द्वारे १,३५० किलो व वाहन क्रमांक MH15 HH 7945 द्वारे ३,४१० किलो असे एकूण ४,७६० किलो (४ टन ७६० किलो) निर्माल्य व तत्सम कचऱ्याचे संकलन करण्यात आले. संकलित करण्यात आलेला कचरा पुढील प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या खत प्रकल्पावर रवाना करण्यात आला. अशा प्रकारे उत्सवाच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात आली.

सदर विशेष स्वच्छता मोहिमेत नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक हर्षद मारू, गणेश तांबे,प्रशांत तेजाळे,मुकादम नंदू गवळी, किशोर साळवे, गंगापट्टेवाले अनिल नेटावटे,असिफ शेख तसेच महानगरपालिकेचे १८ कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे श्री. विलास नाईकवाडे व त्यांचे ४५ स्वच्छता कर्मचारी यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता यंत्रणेस सहकार्य करून स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.सण-उत्सवांच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या निर्माल्य व इतर कचऱ्याचे योग्य संकलन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करावा.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून शहराच्या स्वच्छतेस सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या