मविप्रच्या उदाजी महाराज वारसा संग्रहालयात चित्रकथी कलेतून उलगडले रामायण
नाशिक :- जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून मविप्रच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, INTACH नाशिक चॅप्टर व पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालय संचनालय नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकार श्रीमती सुहासिनी कुलकर्णी यांच्या पैठण शैलीतील पारंपरिक ‘चित्रकथी रामायण’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि के. के. वाघ ललितकला महाविद्यालयाचे प्राचार्य बाळ नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रप्रदर्शनासाठी अल्पारंभ फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.पारंपरिक पैठण चित्रशैली आणि चित्रकथी कलेच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंग, व्यक्तिरेखा आणि सांस्कृतिक परंपरा चित्ररूपात साकारण्यात आल्या आहेत. भारतीय लोककला आणि चित्रपरंपरेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्घाटनप्रसंगी मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे,अल्पारंभ फाउंडेशनचे संचालक रघुवीर अधिकारी, पुरातत्त्व विभाग,नाशिक सहायक संचालक अमोल गोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, प्रा. शशिकांत मोगल, आयटीआयचे प्राचार्य आर. बी.पाटील, ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजा नरवडे,उदाजी अर्ली इयर शाळेच्या प्राचार्या दीप्ती पटेल,आर्किटेक्त कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच INTACH नाशिकचे सर्व सदस्य, संग्रहालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. INTACH च्या समन्वयक रितू शर्मा यांनी आभार मानले.
रसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा : ॲड. नितीन ठाकरे
‘चित्राकथी रामायण’ हे प्रदर्शन दिनांक २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार असून, कला रसिक, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संग्रहालयाला मौल्यवान ठेवा भेट
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त संग्रहालयाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक संग्रहात मोलाची भर घालणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण वस्तूंची भेटही यावेळी देण्यात आली. अनंत कुलकर्णी यांनी पुरातन लेखन साहित्याचा संच संग्रहालयास भेट दिला, तर महेंद्र कुलकर्णी यांनी दक्षिण आणि उत्तर भारतातील प्राचीन काळातील सुमारे ४० नाणी संग्रहालयास प्रदान केली. या दोन्ही वस्तू संग्रहालयाच्या कायमस्वरूपी संग्रहाचा भाग म्हणून नागरिक व अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
0 टिप्पण्या