नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मालेगावातून चोरलेल्या ११ मोटार सायकली हस्तगत



नाशिक/मालेगाव :- नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहर आणि परिसरातून चोरी झालेल्या ११ मोटार सायकली हस्तगत करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.या कारवाईत पोलिसांनी एकूण ५,९०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अशी झाली कारवाई:
मालेगाव शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक,मालेगाव यांनी गुन्ह्यांचा आढावा घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना,गुप्त बातमीदाराकडून एक संशयित चोरीची दुचाकी घेऊन जाफर नगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जाफर नगर परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटार सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता,त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने आपले नाव मुद्दस्सीर अहमद जमील अहमद उर्फ मुद्दस्सीर वायरमन (वय ३०, रा. जाफरनगर, मालेगाव)असल्याचे सांगितले.
११ दुचाकी जप्त,साथीदार फरार:
सं.आरोपीत मुद्दस्सीर याने त्याचा साथीदार मुज्जू फिटर (रा.नुराबाग, मालेगाव) याच्या मदतीने सौंदाणे येथून ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.तसेच या दोघांनी मिळून मालेगाव शहर,नांदगाव आणि धुळे अशा विविध भागांतून एकूण ११ मोटार सायकली चोरल्याचे मान्य केले.सं.आरोपीत मुद्दस्सीरच्या ताब्यातून पोलिसांनी खालीलप्रमाणे ११ दुचाकी जप्त केल्या आहेत:

०३ होंडा युनिकॉर्न
०२ होंडा शाईन
०२ बर्गमन स्कुटी
०२ सुझुकी ॲक्सेस स्कुटी
०१ रॉयल इनफिल्ड बुलेट
०१ बजाज चॅम्पियन

या कारवाईमुळे मालेगाव तालुका पोलीस ठाणे,नांदगाव पोलीस ठाणे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाणे (धुळे) येथील प्रत्येकी एक असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.सध्या मुख्य सं.आरोपीत मुद्दस्सीर अहमद याला मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून,त्याचा फरार साथीदार मुज्जू फिटर याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
पोलीसांचे नागरिकांना आवाहन:
जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी सध्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या आहेत.ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत,त्यांनी आपल्या गाडीच्या मूळ कागदपत्रांसह मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून खात्री करावी.तसेच,नागरिकांनी जुनी वाहने खरेदी करताना कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करावी आणि विना नंबर प्लेट किंवा संशयास्पदरीत्या कमी किंमतीत वाहन विकणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या