नाशिक :- जागतिक कीर्तीचे देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.श्रावण मासात भाविकांची होणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ पासून ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे 'व्हीआयपी' (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे.
केवळ शासकीय प्रोटोकॉललाच परवानगी
देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, केंद्रीय स्तर,राज्य स्तर किंवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या अधिकृत राज्य शिष्टाचार (प्रोटोकॉल) संबंधीच्या लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा माध्यमातून व्हीआयपी दर्शन घेता येणार नाही.सर्वसामान्य भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत राहावे लागू नये आणि त्यांचा वेळ वाचावा,या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेळेची मर्यादा निश्चित
शासकीय प्रोटोकॉल अंतर्गत येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) दर्शनासाठीही देवस्थानने आता कडक नियमावली आणि वेळेची मर्यादा लागू केली आहे. त्यानुसार,अशा व्यक्तींना केवळ खालील वेळेतच दर्शनाची परवानगी असेल.सकाळी: ०६:०० ते १०:०० वाजेपर्यंत.सायंकाळी: ०६:०० ते रात्री ०८:०० वाजेपर्यंत विभागाकडून येणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांचा दर्शन सोहळा सुलभ करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे,असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या