नाशिक,दि.18 जुलै - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यास चालना मिळणार असून,गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी केले.कळवण तालुक्यातील भैताणे येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार नितीन पवार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण कश्मीरा संखे,पोलीस अधीक्षक डॉ.एस. स्वामी,तहसीलदार रोहिदास वारुळे, महावितरणचे अभियंता जगदाळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार,भैताणे गावाचे सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व आणि त्यातून होणारे दीर्घकालीन लाभ ग्रामस्थांना समजावून सांगितले.सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ,पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध होणार असून,भविष्यात गाव विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल,असे त्यांनी सांगितले.तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे समाधान करत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी त्यांनी सांगितले की,या प्रकल्पासोबतच सामाजिक सहाय्यता निधीच्या माध्यमातून गावात रस्ते,ग्रंथालय,शाळा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा कंपनीमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून,ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी केले.
0 टिप्पण्या