ईनरव्हिल क्लब ऑफ अपेक्स सटाणा चा पदग्रहण सोहळा संपन्न


अध्यक्षपदी त्रिवेणी कुंवर तर सचिवपदी तृप्ती कुंवर यांची निवड; 

वृक्षारोपणाने नव्या कार्यकाळाची सुरुवात
सटाणा :-येथील नामांकित सामाजिक संस्था "ईनरव्हिल क्लब ऑफ अपेक्स सटाणा"चा पदग्रहण सोहळा नुकताच मावळत्या अध्यक्षा वंदना भामरे,यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.दीपप्रज्वलन आणि ईनरव्हिल प्रार्थनेने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात करण्यात आली.यावेळी सोहळ्यात मावळत्या अध्यक्षा वंदना भामरे,यांनी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षा त्रिवेणी कुंवर,यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपवली.तसेच मावळत्या सचिव अपर्णा येवलकर, यांनी नूतन सचिव तृप्ती कुंवर,यांच्याकडे आपल्या पदाचा कार्यभार हस्तांतरित केला. उपस्थित सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवीन कार्यकारिणीचे स्वागत केले.नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारताच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आपल्या पहिल्याच सामाजिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.याप्रसंगी पदग्रहण सोहळ्यास नगराध्यक्षा हर्षदा पाटील,यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली.नगराध्यक्षा हर्षदा पाटील तसेच ईनरव्हिल क्लब पदाधिकारी यांच्या हस्ते आंबा,चिंच,आवळा,जांभूळ, पिंपळ आणि बेल यांसारख्या विविध उपयुक्त व औषधी वृक्ष रोपे लावण्यात आली.केवळ वृक्षारोपण करून न थांबता,या लावलेल्या रोपांच्या जतन व संगोपनाची संपूर्ण जबाबदारीही क्लबने स्वीकारली आहे.निसर्गाशी नातं अधिक घट्ट करण्याचा हा एक छोटासा पण मोलाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या सोहळ्याला सटाणा शहर नगराध्यक्षा हर्षदा पाटील,क्लबच्या संस्थापक अध्यक्षा प्रा.वर्षा शिरोडे,यांच्यासह वंदना भामरे,अपर्णा येवलकर,त्रिवेणी कुंवर,तृप्ती कुंवर,सुवर्णा जंगम,पल्लवी बागड,आशा सोनवणे,वंदना सोनवणे,पुष्पा जाधव, डॉ.विद्या सोनवणे,अलका राणे,कविता राजपूत,आदी मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्षा प्रा.वर्षा शिरोडे,यांनी ईनरव्हिल क्लबच्या उद्दिष्टांची व कार्याची माहिती मांडली.मावळत्या अध्यक्षा वंदना भामरे,यांनी गतवर्षात राबवलेल्या विविध सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचा आढावा घेतला.नूतन अध्यक्षा त्रिवेणी कुंवर,यांनी आपल्या प्रास्ताविकातून आगामी वर्षातील नियोजित कार्याची दिशा स्पष्ट केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी सचिव अपर्णा येवलकर,यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या