इगतपुरी,नाशिक ग्रामीण : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य ३ फरार आरोपींना अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि इगतपुरी पोलिसांच्या पथकाने मुंढेगाव शिवारात सापळा रचून ही कारवाई केली.या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला होता.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
९ आरोपी आधीच कोठडीत,३ फरार अटकेत
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी यापूर्वीच इगतपुरी तालुक्यातील ९ आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, घटनेनंतर या गुन्ह्यातील मुख्य ३ आरोपी फरार झाले होते.त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते.
मुंढेगाव शिवारात रचला सापळा
फरार आरोपी मुंबई-आग्रा महामार्गाने मुंढेगाव शिवारात मोटारसायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंढेगाव परिसरात तात्काळ सापळा रचला आणि खालील तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले:
१) राहुल भोरू भागडे (वय २६, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक)
२) आकाश चंद्रकांत भोईर (वय २७, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक)
३) कैलास अशोक भागडे (वय २८, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक)सराईत गुन्हेगार; दुचाकी जप्त अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली हिरो पॅशन मोटारसायकल (क्र. MH 15 KA 4502) पोलिसांनी जप्त केली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपीत क्रमांक १ (राहुल भागडे) आणि आरोपी क्रमांक २ (आकाश भोईर) हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून,त्यांच्यावर यापूर्वी इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा (मर्डर) प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
पोलीस प्रशासनाचे यश
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी,अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करत आहेत.
0 टिप्पण्या