महाराष्ट्र - शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पशुपालनावर भर


गोआधारीत अर्थव्यवस्थेला चालना; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चा समारोप

नागपूर,दि.५ :- पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना (ग्रोथ स्ट्रॅटेजी) तयार करण्यात आली असून याद्वारे २५ टक्के विकास दर गाठण्याचा प्रयत्न आहे. यातून शेतीपूरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल व या प्रयत्नात राज्य गोसेवा आयोगाचे मोलाचे योगदान असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.गोआधारीत अर्थव्यस्थेला चालना देण्यात येईल व यातून शेतकऱ्यांना संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि राज्य गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा-२०२६’च्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,नागपूरच्या महापौर नीता ठाकरे,खासदार माया इवनाते,पशु संवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील,महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,म्हणाले की,भारतदेशात समृद्ध कृषी संस्कृती होती व तिच्या केंद्रस्थानी गाय होती. गाय ही आधार देणारी आहे.गीर, थारपारकर,राठी, सहिवाल,लालसिंधी, देवणी,गवळावू असा भारतीय देशी गायींचा मोठा इतिहास आहे. देशी गायींच्या संवर्धनातून शेतीच्या प्रगतीला चालना मिळते असेही सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,ब्राझील देशाने भारतीय देशी गायींवर प्रयोग करून त्या देशात दूध उत्पादन वाढविण्याची क्रांती केली.जगातील १० देशांनी भारतीय देशी गायी नेऊन संकरीत गायी तयार केल्या त्या देशांमधील गायींमध्ये ८० टक्के जीन हे भारतीय देशी गायींचे आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे गायी आहेत त्यांनी विपरीत परिस्थितीत डगमगून न जाता आत्महत्या न केल्याचे संशोधन व अहवाल प्रसिद्ध असल्याचे सांगून त्यांनी गायींचे महत्व अधोरेखीत केले. मोठ्या प्रमाणातील जागृती व विकसित पद्धतीतून देशात मोठया प्रमाणात दूध देणाऱ्या गायी तयार करता येतील असे चित्र आहे. याला संशोधनाची जोड देऊन मूल्य साखळी निर्माण करता येईल असेही त्यांनी सांगितले.गायींच्या संरक्षण व संवर्धनासोबतच संशोधनाची जोड देत प्रत्येक गोशाळा शक्ती केंद्र व्हावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोपालनासोबतच गोआधारीत अर्थव्यवस्था उभी करता येईल व त्यातून मोठे परिवर्तन साधता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गायीच्या शेणापासून निर्मित पेंट, विविध औषधांमध्ये गोमूत्र, शेण व दुधाचा वापर अशा गोआधारीत उत्पादनाचे योग्य ब्रँडिंग करण्यात पुढाकार घ्यावा राज्यशासन अशा उत्पादनांना वेगवेगळया ठिकाणी सवलतीच्या दरात किंवा नाममात्र दरात स्टॉल्स उपलब्ध करून देईल असेही त्यांनी सांगितले.

गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत.भविष्यात गोआधारीत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी निर्णय घेतले जातील. यातून या क्षेत्राला बळ मिळेल व यासाठी गोसेवा आयोग आणि गोपालकांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोवंश संरक्षणासाठी राज्य शासनाने कठोर निर्णय घेतले- डॉ. पंकज भोयर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वामुळे राज्यात गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी कठोर निर्णय घेण्यात आल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर,यांनी सांगितले.गोतस्कारांवर (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा )मकोका लावण्याचा निर्णय घेवून राज्यात गोतस्कारीला आळा घालण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडले.तसेच ज्या वाहनांद्वारे वारंवार गोतस्करी घडते त्या वाहनांची नोंदणी कायम स्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.येत्या काळातही गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील असेही डॉ.भोयर म्हणाले.

चारा लागवडीसाठी महत्वाचा शासन निर्णय निर्गमीत करून गोवंश संवर्धन – ॲड. आशिष जयस्वाल

गोवंश संवर्धनासाठी राज्य शासनाने सक्रीय पुढाकार घेतला असून गायींचे सुयोग्य पोषण होऊन त्यांना चारा उपलब्ध होण्यासाठी १९ जून २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात आल्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, यांनी सांगितले.या निर्णयाद्वारे गायींच्या चाऱ्यासाठी शासकीय जागा महिला बचत गटांना ३ वर्षासाठी पट्टा (लीज) करारावर देण्यात येणार असून गायींना चराईसाठी क्षेत्र राखीव होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते राज्य गोसेवा आयोगाच्या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे आणि गोसेवा आयोग योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.राज्यातील गोशाळांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी गोटेन ब्रँड या बोध चिन्हाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,यांनी प्रास्ताविकाद्वारे आयोगाच्या कार्याबाबत व राज्यमाता गोमाता संवाद यात्रेची माहिती दिली.

राज्यात २२ जून ते ५ जुलै २०२६ राज्यमाता गोमाता संवाद यात्रा राज्यात गोसंवर्धन,गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली.या यात्रेदरम्यान राज्यातील २५ जिल्ह्यांत प्रत्यक्ष भेटी देत सुमारे ६ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यात आला.एक हजारहून अधिक गोशाळांचा सहभाग नोंदविण्यात आला. सुमारे १५ हजार गोशाळा संचालक, गोसेवक,गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या