चिंचवड गावात विजेचा खेळखंडोबा; मधुकर बच्चे आक्रमक,अभियंत्यांना दिले निवेदन



चिंचवड :- गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव आणि परिसरात विद्युत पुरवठ्याचा सतत खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे,यांनी थेट महावितरणचे अभियंता मुंडे,यांची प्रत्यक्ष भेट घेतली.त्यांनी परिसरातील वीज समस्येबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निवेदन दिले आहे.नागरिकांचा छळ,तासनतास वीज गुल.
चिंचवडगाव,केशवनगर,तानाजी नगर आणि लगतच्या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे, वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे अत्यंत किरकोळ असतात. मात्र,महावितरणच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना कधी चार-पाच तर कधी तब्बल आठ-आठ तास अंधारात काढावे लागत आहेत.यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे."अनेकदा खाजगी एजन्सी वेळेत उपलब्ध न होणे किंवा केबल टेस्टिंग गाडी वेळेत न मिळणे अशी तांत्रिक कारणे पुढे केली जातात.मुळात या गोष्टींचे पूर्वसंयोजन करण्याची जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची आहे.सध्या अनेक ठिकाणी खाजगी एजन्सीच महावितरणची कामे करत आहेत. जर या एजन्सी मनमानी कारभार करत असतील,तर वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई न करता गप्प का बसले आहेत?असा थेट सवाल मधुकर बच्चे यांनी यावेळी उपस्थित केला.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित आणि गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यापुढे चिंचवडगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही,याची दक्षता महावितरणने घ्यावी.अन्यथा,नागरिकांच्या संयमाचा बांध सुटेल आणि निर्माण होणाऱ्या तीव्र जनरोषाला सर्वस्वी महावितरणचे अधिकारीच जबाबदार असतील,असा इशाराही मधुकर बच्चे,यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या