कांदा खरेदी वाढविण्यासाठी नाफेडने जनजागृती करावी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची लासलगाव बाजार समितीला भेट

नाशिक,दि.२ :- जिल्ह्यात नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झालेली आहे. कांदा खरेदीचे प्रमाण वाढविण्यासाठी नाफेडने लासलगाव बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात जनजागृतीपर फलक लावावेत. नाफेडतर्फे होणाऱ्या कांदा खरेदीची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
 
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी आज सायंकाळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत नाफेडकडून सुरू असलेल्या कांदा खरेदीचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण,(मालेगाव),निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे,लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सुवर्णा जगताप,व्यापारी संचालक प्रवीण कदम,बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे,आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की,नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू आहे.आतापर्यंत वेळोवेळी दरवाढ झाली आहे. त्यामुळे नाफेडने दोन कर्मचारी नियुक्त करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.तसेच कांद्याचे दर,नियमावली याविषयी माहिती द्यावी.सध्या कांद्याला १८७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मालेगाव,पिंपळगाव बसवंत प्रमाणेच लालसगावला कांदा खरेदीचे प्रमाण वाढवावे. शेतकऱ्यांचा कांदा खरेदीसाठी लिलावानंतर किमान दोन नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी थांबावे. तसेच सरसकट कांद्याची खरेदी करावी. त्यासाठी बाजार समितीने सनियंत्रण करावे. 

कांदा खरेदीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद,यांनी नाफेडचे शाखा व्यवस्थापक अनिकेत मदान, एनसीसीएफचे व्यवस्थापक हर्ष यांच्या समवेत चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी कांद्याची आवक,आतापर्यंत झालेली खरेदी,दर याविषयीही माहिती घेतली.यावेळी बाजार समितीचे सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत,लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील,आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या