(कळवण प्रतिनिधी)
कळवण (नाशिक):- महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार कायद्यामध्ये (RTI) केलेल्या बेकायदेशीर आणि सोयीस्कर बदलांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णासाहेब हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.येत्या ५ जुलै २०२६ पासून अण्णा हजारे राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.या आंदोलनाला कळवण तालुक्यातील 'भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासा'ने जाहीर पाठिंबा दिला असून,शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात 'भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासा'च्या पदाधिकाऱ्यांनी कळवणचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांना लेखी निवेदन सादर केले.
महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती अधिकार कायद्यामध्ये काही दुरुस्त्या आणि बदल केले आहेत. हे बदल बेकायदेशीर असून, शासनाने स्वतःच्या सोयीसाठी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.या बदलांमुळे माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे.त्यामुळे अण्णासाहेब हजारे यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने सदर दुरुस्त्या तातडीने रद्द कराव्यात,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर शासनाने या दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत,तर 'भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासा'च्या वतीने कळवण तालुका उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय निंबाजी मोरे,कळवण शहर प्रमुख विजय एकनाथ जाधव,अभोणा प्रमुख विजय वामन चव्हाण, संघटक विजय दत्ता भामरे,सचिव सुरेश पुंडलिक जाधव,यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या