नाशिक - समाजाने बालमधुमेहाविषयी साक्षर आणि संवेदनशील होण्याची गरज- डॉ. रवींद्र नांदेडकर,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिकः- टाईप वन डायबिटीस असलेल्या मुलांना अर्थात बालमधुमेहींना सशक्त सामाजिक वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाने बालमधुमेहाविषयी साक्षर आणि संवेदनशील झाले पाहिजे.या पार्श्वभूमीवर अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य राबविण्यात येत असलेल्या बालमधुमेह दत्तक योजनेचा विस्तार संपूर्ण भारतात केला जात आहे,अशी माहिती पुणे येथील अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ.रवींद्र नांदेडकर यांनी आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त तथा आधुनिक वैद्यकशास्त्रातील अभ्यासक डॉ. श्रुती रवींद्र नांदेडकर उपस्थित होत्या.सध्या त्या मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी. पदव्युत्तर शिक्षण घेत असून,त्यांनी डॉ.रवींद्र नांदेडकर,यांच्यासमवेत सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांसाठी अनेक जनजागृती शिबिरे घेऊन व्याख्याने दिली आहेत.

यावेळी बोलताना डॉ.रवींद्र नांदेडकर,म्हणाले की,अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण भारतातील मधुमेहींसाठी बालमधुमेह दत्तक योजना पूर्णपणे मोफत राबविली जाते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालमधुमेहींची नोंदणी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या anuyash.org या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.ही नोंदणी प्रक्रीया देखील विनामूल्य उपलब्ध आहे. संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर बालमधुमेहींना समुपदेशन,आरोग्य सल्ला आणि औषधोपचार तसेच फॉलोअप या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. बालमधुमेह दत्तक योजना ही संपूर्ण भारतातील अशी पहिली आणि एकमेव योजना आहे की,ज्यामध्ये १८ वर्षापर्यंतच्या सर्व राज्यातील, सर्व उत्पन्न गटातील बालमधुमेह असलेल्या मुला-मुलींसाठी राबविली जाते.मुख्य म्हणजे बालमधुमेहींना घरपोच मोफत औषधे देखील पाठवली जातात. यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या आरोग्य स्थितीबाबत वेळोवेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठनला माहिती देणे आवश्यक असते.आज दुर्दैवाने भारत हा मधुमेहाची जागतिक राजधानी झाला असून प्रौढांमध्ये आढळणाऱ्या टाइप-2 डायबिटीस प्रमाणेच मुलांमध्ये आढळणाऱ्या टाइप-1 डायबिटीसचे प्रमाण देखील भारतात वाढते आहे.सुमारे तीन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने महापालिकेच्या शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये देखील ही बाब अधोरेखित झाली आहे.आता सीबीएसईच्या शाळांनी बालमधुमेह या व्याधीवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून प्रत्येक शाळेत याविषयी जागृती करण्यासाठी विशेष फलकाची योजना देखील केली आहे. 

या पार्श्वभूमीवर अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे बालमधुमेह या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे.बालमधुमेहींची सातत्याने रक्त शर्करा चाचणी करणे,त्यानुसार इन्सुलिनचे डोस ठरविणे,त्यातून येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा त्या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांवर आणि संपू्र्ण कुटुंबावर देखील परिणाम करणारा असतो. मधुमेहामुळे या बालकांच्या आरोग्याचे होणारे नुकसान आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करीत असताना मानसिक आणि भावनिक पातळीवर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला करावा लागणार संघर्ष या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न अनुयश आरोग्य प्रतिष्ठान करीत आहे. 

इन्सुलिन हे एनाबोलीक इन्सुलिन असून ते मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक असते.मात्र, त्याच्या अभावामुळे बालकांना टाइप-1 डायबिटीसचा सामना करावा लागतो.शिवाय इन्सुलिनच्या अभावामुळे त्यांची वाढ नैसर्गिकपणे होत नाही.तसेच ग्लुकोज हा आपल्या शरीराला ऊर्जा देणारा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे.इन्सुलिनच्या अभावामुळे हे ग्लुकोज शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही.त्यामुळे बालमधुमेहींची एकूणच प्रकृती आणि त्यांचे आरोग्य हे पालकांसाठी कायमच चिंतेचा विषय असते.बालमधुमेहींची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि या सगळ्याचा एकंदरीत परिणाम त्या मुलांच्या मनावर होतो. ते एकलकोंडे होतात,आत्मविश्वास कमी होतो, कृतीशीलतेमध्ये मर्यादा येतात. इतकेच नाही तर मधुमेहामुळे त्यांचे डोळे,किडनी यावर देखील परिणाम होतो. 
या पार्श्वभूमीवर अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आज भारतातील २००० बालमधुमेहींना मोफत घरपोच विनामूल्य औषध पाठवले जाते.तसेच मधुमेह असलेल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांच्या पालकांचे मनोबल वाढविण्याचे,त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्याचे आणि समाजाने देखील बालमधुमेहींकडे सकस दृष्टीने पहावे,यासाठी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान कार्य करीत आहे. 
टाईप वन डायबिटीस अर्थात बालमधुमेहाविषयी आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे.मुलांमध्ये अचानक दिसून येणाऱ्या या व्याधीमुळे बरेचदा पालक देखील भांबावून जातात. बालमधुमेहींचा आजार,दिनचर्या, त्यांचा अभ्यास,सामाजिक दबावातून येणारा मानसिक आणि भावनिक ताण या सगळ्याच पातळीवर पालकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते.मात्र, बालमधुमेहींचा आहार,इन्सुलिनचे व्यवस्थापन,दैनंदिन रक्त शर्करा तपासणीच्या नोंदी आणि व्यायाम या चतुःसुत्रीच्या आधारे बालमधुमेहाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येते.यासाठी पालकांना इन्सुलिनचा डोस कधी, कसा आणि किती प्रमाणात द्यायचा याचे योग्य प्रशिक्षण घ्यावे लागते. बालमधुमेहींचा आहार कसा असावा,त्यांनी कोणत्या प्रकारचे खेळ खेळावे,योगासन,प्राणायाम आणि ध्यान धारणेच्या माध्यमातून मानसिक बळ कसे वाढवावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  तसेच संगोपनातील बाल्यावस्था, बालक अवस्था,कुमारावस्था अशा विविध टप्प्यांच्या अनुषंगाने होणारे बदल विशद केले.पौगंडावस्थेमध्ये शारिरीक,मानसिक आणि भावनिक स्तरांवर होणाऱ्या स्थित्यंतरांमध्ये बालमधुमेहींच्या नेमक्या समस्या काय असतात आणि त्यावर कशी मात करावी,याविषयी देखील डॉ.रवींद्र नांदेडकर,यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त तथा आधुनिक वैद्यकशास्त्रातील डॉक्टर डॉ.श्रुती रवींद्र नांदेडकर,म्हणाल्या की,आज बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा,उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत असून, पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळणारा टाईप-२ मधुमेह आता किशोरवयीन मुलांमध्येही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई शाळांमध्ये‘माय शुगर बोर्ड’ उपक्रम सुरू केला आहे.डॉ. श्रुती नांदेडकर पुढे म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही टाईप-१ मधुमेह (इन्सुलिन-डिपेंडंट डायबिटीज मेलिटस) या बालमधुमेहाविषयी समाजात पुरेशी जनजागृती झालेली नाही.हा ऑटोइम्यून आजार अचानक समोर येत असला तरी सुरुवातीचा महत्त्वाचा कालावधी ओळखून वेळेत निदान व उपचार सुरू केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.अन्यथा डायबेटिक किटोॲसिडोसिससारखी जीवघेणी अवस्था निर्माण होण्याचा धोका वाढतो.त्यामुळे उपचारांइतकेच 'अर्ली इंटरव्हेन्शन' आणि जनजागृती महत्त्वाची आहे. बालरोगतज्ज्ञ, शिक्षक आणि पालक यांनीही टाईप-१ मधुमेहाची लक्षणे व काळजी याबाबत अधिक सजग होणे आवश्यक आहे.गेल्या दहा वर्षांपासून अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे बालमधुमेह दत्तक योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याला समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांनी अधिक व्यापक प्रसिद्धी देऊन महाराष्ट्रभर जनजागृती घडवून आणावी,असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या