जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा
नाशिक,दि.25 :- जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठीच जिल्हा उद्योग मित्र समिती आहे.या समितीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील,जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता थोरात, अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक भीवा लव्हाटे, ‘आयमा’चे अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह उद्योजकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सांगितले की,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.विविध दाखले, परवानगी,अडी अडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांनी आपले सरकार पोर्टलचा वापर वाढविला पाहिजे.कोणत्याही उद्योजकाला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. याबरोबरच उद्योगांच्या वृद्धिसाठी नियमानुसार जास्तीत जास्त सहकार्य करावे.उद्योजकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात. औद्योगिक क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ट्रान्सफॉर्मरकरीता दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल.
तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकास्तरावरही बैठकीचे आयोजन करावे.वीज वितरण कंपनीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. या बैठकीत उद्योजकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक,संघटनांचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या वीज,रस्ते, गटारी,सुरक्षितता आदींबाबत अडचणी मांडल्या तसेच काही उपयुक्त सूचनाही मांडल्या.
0 टिप्पण्या