ओझर (नाशिक):- शेतातून विजेच्या खांबावर बसवलेली लाखो रुपयांची तांब्याची/लोखंडी तार चोरणाऱ्या एका सराईत चोराला ओझर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ओझर येथील बाणगंगा नगर परिसरातील एका शेतातून तब्बल ४९० किलो वजनाची तार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच वेगाने चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे.
७० बंडल तार लंपास
मिळालेल्या माहितीनुसार,ओझर मिग येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी संजय मुरलीधर वाघ (वय ४८) यांचे बाणगंगा नगर भागात शेत गट क्र. ६५/१अ मध्ये शेत आहे.या शेतातील इलेक्ट्रिक पोलवर (विजेच्या खांबावर) साक्षीदार आणि फिर्यादी यांच्या मालकीची ८ नंबर जाडीची आणि १५० फूट लांबीची तार बसवलेली होती. दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने या विजेच्या तारांचे एकूण ७० बंडल (अंदाजे ४९० किलो वजन, किंमत ९,८०० रुपये) कापून चोरून नेले होते. आपल्या शेतातून विजेची तार चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेतकरी संजय वाघ,यांनी ओझर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे,पोलिसांनी या चोरीप्रकरणी संशयित गोरख भिकाजी कडाळे,(वय २६, रा. बाणगंगानगर,ओझर,ता.निफाड, जि.नाशिक) याला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल वारे,करत आहेत.शेतकऱ्याच्या मालावर डल्ला मारणाऱ्या चोराला पोलिसांनी तत्परतेने अटक केल्यामुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या