खाजगी इसमामार्फत लाच घेणे भोवले आरटीओ इन्स्पेक्टर सह एक इसम ताब्यात


नागपूर :- प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर ग्रामीण येथील मोटार वाहन निरीक्षक यांचेविरुद्ध ACB नागपूरने केली यशस्वी सापळा कारवाई यातील तक्रारदार हे ट्रक चालक मालक असून त्यांना महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा तपासणी नाका खुर्सापार येथील आरटीओ चेकपोस्ट येथून वाहन पास (एन्ट्री) करण्याकरिता तेथील अधिकारी व त्यांचे अखत्यारित खाजगी इसम यांनी ५००/- रू. लाचेची मागणी करून स्वीकारली होती. तक्रारदार यांना परत सीमा तपासणी नाका खुर्सापार येथून ट्रक पास (एन्ट्री) करणे असल्याने त्यांना आरटीओ चेक पोस्टवर लाचेची मागणी होण्याची खात्री असल्याने त्यांनी दिनांक १०/०६/२०२६ रोजी ACB नागपूर कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार दिली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ११/०६/२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा तपासणी नाका खुर्सापार येथील आरटीओ चेकपोस्ट येथून ट्रक पास (एन्ट्री) करण्याकरिता लोकसेवक साजन शालिग्रामजी शेंडे, वय ५० वर्ष,मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग,नागपूर ग्रामीण हे कर्तव्यावर हजर असताना खाजगी इसम प्रवीण बाबूराव गायधने,वय ५० वर्ष यांनी तक्रारदार यांना ५००/- रुपये लाचेची मागणी केली.
सापळा कारवाई दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा तपासणी नाका खुर्सापार येथील आरटीओ चेक पोस्टवर ट्रक पास (एन्ट्री) करण्याकरिता खाजगी इसम प्रवीण बाबूराव गायधने यांनी ५००/- रुपये लाच स्वीकारली. त्यास लोकसेवक साजन शालिग्रामजी शेंडे,मोटार वाहन निरीक्षक यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलीस स्टेशन केळवद,नागपूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अ, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर,माधुरी बाविस्कर,अपर पोलीस अधीक्षक व विजय माहुलकर,अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली, भारती गुरुनुले,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.,नागपूर यांचे पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया,सापळा पथक राजकिरण येवले,पोलीस निरीक्षक,पोहवा योगेश साधनकर,महिला पोलीस हवालदार कांचन गुलबासे,पोअं. उपेंद्र आकोटकर,सचिन किल्हेदार, चालक पोहवा विलास इंगळे,सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर यांनी केलेली आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की,कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे संपर्क साधावा. तक्रारदाराच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात येईल व तक्रारदार यांचे सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम ही १ महिन्याचे आत परत केल्या जाईल. तसेच तक्रारदारांचे शासकीय विभागांत अडकलेले वैध कामही पूर्ण करून दिले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या