नाशिक - नव्या शैक्षणिक वर्षाचा 'मास्टर प्लॅन' तयार! शाळांच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक-शिक्षकांना मिळाल मार्गदर्शन


आगामी शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी व विविध उपक्रम नियोजनाबाबत बैठक संपन्न मुख्याध्यापक-शिक्षकांना मार्गदर्शन
नाशिक :- नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर,शाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर येथे मनपा शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांची व शिक्षकांची एक अत्यंत महत्वपूर्ण आणि विस्तृत आढावा बैठक संपन्न झाली. 

आगामी वर्षात शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विविध शासकीय उपक्रम प्रभावीपणे राबवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
शैक्षणिक उपक्रमां विषयी मार्गदर्शन
या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी मागील शैक्षणिक वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला आणि शिक्षकांच्या कामगिरीचे कौतुक केले.तसेच,आगामी नवीन शैक्षणिक वर्षात राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी व शैक्षणिक उपक्रमांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. नवीन वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा,यासाठी'शाळा प्रवेशोत्सव'अतिशय उत्तम,उत्साही आणि कौतुकास्पद वातावरणात साजरा करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.यासोबतच नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला पहिल्या दिवशीच सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप आणि पाठ्यपुस्तक वाटप वेळेत पूर्ण करून नियोजित वेळेत शिक्षण सुरू होईल याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी 'स्पेलिंग बी'स्पर्धा आणि विविध स्पर्धा परीक्षांचे नेटके आयोजन करावे,शालेय परिसर, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखून शाळांमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे,विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीसाठी शैक्षणिक सहलींचे नियोजन करावे,तसेच'नवभारत साक्षरता अभियानांतर्गत'नियोजित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत,असे सविस्तर दिशादर्शन डॉ.मिता चौधरी,यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

बैठकीच्या दुसऱ्या सत्रात डिजिटल शिक्षणाला गती देण्यासाठी चव्हाण, आणि महाजन,यांनी 'विनोबा ॲप' (Vinoba App) ची उपयुक्तता,त्याचा वापर आणि शिक्षकांसाठी असणारे त्याचे महत्त्व यावर सविस्तर तांत्रिक माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि हक्कांच्या संरक्षणासाठी जिल्हा महिला व बाल कल्याण विभागामार्फत श्रीम.तपकिरे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. त्यांनी 'चाइल्ड हेल्पलाइन' (Child Helpline) च्या कार्यपद्धतीबाबत आणि संकटसमयी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या सुविधेचा वापर कसा करावा, याबद्दल शिक्षकांमध्ये जनजागृती केली.शाळेतील अध्यापन अधिक रंजक व सोपे करण्यासाठी सीताराम अहिरे,यांनी उपस्थित शिक्षकांना विशेष मार्गदर्शन केले.वर्गामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध भाषा,गणित आणि विज्ञान विषयांच्या'साहित्य पेटीचा' (Educational Kits) प्रत्यक्ष वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कशी प्रभावी करावी,याची माहिती त्यांनी दिली.
या महत्वपूर्ण बैठकीचे सूत्रसंचलन पाठक,यांनी केले.बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयंत शिंदे,प्रल्हाद हंकारे,यांच्यासह नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या बैठकीला नाशिक महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षण विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहभागाने आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक आणि उत्साही वातावरणात झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या