कडधान्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना सरकार देणार अनुदान; जाणून घ्या कशी आहे योजना!



नाशिक :- कडधान्य पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे या उद्देशाने शासनाने सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी अनुदान योजना सुरू केली आहे.या योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी एक घटकाचा लक्षांक मंजूर करण्यात आला असून,पात्र शेतकरी उत्पादक संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, क्लस्टर स्तर महासंघ तसेच वैयक्तिक उद्योजकांनी ३० जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,यांनी केले आहे.कडधान्य उत्पादनाला बाजारपेठेत अधिक मूल्य मिळावे,शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावेत तसेच ग्रामीण भागात कृषी-आधारित उद्योगांना चालना मिळावी यासाठी योजनेअंतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री तसेच इमारत, गोदाम आणि साठवण सुविधांच्या निर्मितीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.संबंधित बांधकाम खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान मंजूर केले जाणार आहे.वैयक्तिक अर्जदारांचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे.एका कुटुंबातील स्वतः,पती किंवा पत्नी तसेच अविवाहित मुलांपैकी केवळ एका व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.तसेच अर्जदाराकडे प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम आणि आवश्यक कार्यभांडवल उभारण्याची आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे.या योजनेतील अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी देण्यात येणार असून, जमीन,वीज,मनुष्यबळ तसेच इतर खर्चांसाठी अनुदान देय राहणार नाही.योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून,बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदानाचा लाभ मिळणार आहे.शेतकरी उत्पादक संस्था,क्लस्टर स्तर महासंघ आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या संस्थांनी मागील दोन वर्षांपासून नोंदणीकृत व कार्यरत असल्याचे पुरावे, तसेच मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे.संबंधित संस्थांसह वैयक्तिक अर्जदारांनी ७/१२ आणि ८-अ उतारे जोडणे बंधनकारक आहे.इच्छुक शेतकरी,संस्था आणि उद्योजकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३० जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका अथवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या