नांदेड :- बदली प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी,कोणतीही नोटीस न देण्यासाठी आणि शालेय खर्चाचा प्रलंबित हप्ता वसूल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.राजेश गोविंदराव पडळवार (वय ५१, रा. शारदानगर,नांदेड) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.नेमकं काय आहे प्रकरण? तक्रारदार हे मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयात लिपिक (क्लर्क) पदावर कार्यरत आहेत.आरोपीत मुख्याध्यापक पडळवार,याने तक्रारदाराकडे विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाने जानेवारी ते मे २०२६ या ५ महिन्यांचे प्रत्येकी १२ हजार रुपयांचे हप्ते, तसेच बदली करून देण्यासाठी आणि नोटीस न देण्यासाठी एकूण ६०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रंगेहात तक्रार नोंदवली. राहत्या घरी रचला सापळा तक्रारदाराने लाचे संदर्भात मुख्याध्यापकाशी संपर्क साधला असता,पडळवार याने त्यांना ३ जून २०२६ रोजी रात्री शारदानगर येथील आपल्या राहत्या घरी (गजानन अपार्टमेंट) बोलावून घेतले.तेथे शासकीय पंचांसमक्ष ६० हजार रुपयांवरून तडजोड होऊन ५०,०००/- रुपये स्वीकारण्याचे मुख्याध्यापकाने मान्य केले.
तडजोडीनंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक राजेश पडळवार याला रंगेहात ताब्यात घेतले. गुन्हा दाखल आणि आवाहन या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,यांच्या मार्गदर्शनानुसार,पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार,पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर, आणि नांदेड युनिटच्या पथकाने पार पाडली.
0 टिप्पण्या