चांदवड (नाशिक):- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर नाशिककडून मालेगावकडे जाणाऱ्या लेनवर,राहूड घाटातील म्हसोबा मंदिरापुढील वळणावर काल एक अत्यंत भीषण अपघात घडला.एका भरधाव क्रेन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या तीन वाहनांना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची हकीकत
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी क्रेन चालक अनुज संजय सिंह (वय २२, रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील क्रेन (क्र. GJ 03 HE 8553) घेऊन राहूड घाटातून जात होता. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटो (क्र. MH 41 AT 9002), महिंद्रा थिरा गाडी आणि आयशर ट्रक (क्र. HR 38 AD 7991) यांना पाठीमागून आणि समोरून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन जणांचा मृत्यू,दोन गंभीर जखमी
या अपघातामध्ये महिंद्रा थिरा गाडीत प्रवास करणारे १) अब्दुल अहिल अब्दुल रहेमान (वय ११ वर्षे) आणि २) अब्दुल कय्युम अब्दुल रज्जाक (वय ६२ वर्षे, दोन्ही रा. मोहनबाया नगर, मालेगाव) या दोन्ही प्रवाशांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.तसेच फिर्यादी चालक योगेश अशोक बाविस्कर आणि साक्षीदार बारकु वैद्य हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीसांकडून गुन्हा दाखल, आरोपीला अटक
अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (पोनि) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेन चालक अनुज संजय सिंह,याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) सन २०२३ चे कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपीत क्रेन चालकाला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) नऱ्हे करत आहेत.
0 टिप्पण्या