शेतकऱ्यांची अडवणूक महाग पडली! शासकीय गोदामात 'एसीबी'चा छापा,गोदाम व्यवस्थापक ताब्यात


धुळे: शासकीय गोदामात शेतकऱ्याकडून ५ हजारांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात!
धुळे :- शासकीय गोदामात खरेदीसाठी आणलेल्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून ऑनलाईन बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे येथील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. मनिष महेश बागुल (वय ३० वर्ष) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.या कारवाईमुळे शासकीय धान्य खरेदी केंद्रांवरील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.नेमके काय घडले?तक्रारदार शेतकरी हे धुळे जिल्ह्यातील मौजे अंचार्डे येथील रहिवासी आहेत. त्यांनी रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेनुसार आपली ज्वारी विकण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार ३ जून २०२६ रोजी ते आपली ज्वारी धुळे येथील शासकीय गोदामात विक्रीसाठी घेऊन गेले होते.गोदामात ज्वारीची मोजणी झाल्यानंतर त्यांना मोजमापाच्या पावत्याही देण्यात आल्या.पावती देण्यासाठी लाचेची मागणी,ज्वारीची मोजणी पूर्ण झाल्यावर पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनिष बागुल,याने शेतकऱ्याला बाजूला बोलावले. "तुमच्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करून घेतली आहे, त्याचे ५ हजार रुपये द्यावे लागतील.पैसे दिले नाहीत तर ऑनलाईन बिल टाकणार नाही," अशी उघड धमकी बागुल याने शेतकऱ्याला दिली.शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धुळे कार्यालय गाठून रीतसर तक्रार नोंदवली. 'एसीबी'चा सापळा आणि रंगेहात अटक तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत ३ जून २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पंचांसमक्ष आरोपी मनिष बागुल याने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर गोदामातच लावण्यात आलेल्या सापळ्यात आरोपी मनिष बागुल याला तक्रारदार शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.कारवाई करणारे पथक ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनिल दोरगे,यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे'एसीबी'चे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे,पोलीस निरीक्षक पदमावती कलाल अंमलदार राजन कदम,मुकेश अहिरे,प्रविण मोरे, संतोष पावरा,यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या