नाशिक ग्रामीणमध्ये 'धूम स्टाईल'ने चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १० गुन्हे उघड



नाशिक :- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत,रस्त्यावरील एकट्या महिलांना लक्ष्य करून 'धूम स्टाईल'ने सोनसाखळी ओरबाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गजाआड केले आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नाशिक ग्रामीणमधील तब्बल १० चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

सिनेमॅटिक स्टाईलने केला पाठलाग
मागील काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण भागात महागड्या दुचाकींवरून येत महिलांचे दागिने पळवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निफाड परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान विंचूरकडून नाशिकच्या दिशेने संशयीत आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तात्काळ सापळा रचून निफाड चौफुली परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करत दोन मुख्य संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपीत आणि त्यांचा गुन्हेगारी इतिहास:
अटक करण्यात आलेले सर्व आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी,घरफोडी,चोरी,प्राणघातक हल्ला,खंडणी,दुखापत आणि फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
१) विशाल पोपट सांगळे (वय ३५, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक)

गुन्हेगारी पार्श्वभूमी :- हा मुख्य आरोपी सातपूर पोलीस ठाण्याकडील एका गंभीर गुन्ह्यात फरार होता.त्याच्यावर गंगापूर, सातपूर,इंदिरानगर,सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी,आर्म ॲक्ट आणि फसवणुकीचे एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

२) गणेश उर्फ कुलदिप मनोहर कापसे (वय ४४, रा.अश्वमेध नगर, पेठ रोड, नाशिक)

गुन्हेगारी पार्श्वभूमी :- याच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टसह गंभीर गुन्हे, एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन (अहमदनगर) येथे जबरी चोरी आणि जे.एम.एफ.सी.कोर्टात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल आहे.

३) रोहित केशव गायकवाड (वय २७, रा.पिंपळगाव बसवंत,ता. निफाड;सध्या रा. सातपूर) - मुख्य साथीदार

गुन्हेगारी पार्श्वभूमी :- याच्यावर पिंपळगाव बसवंत आणि वणी पोलीस ठाण्यात चोरी व इतर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत.

४) विजय पांडुरंग उजैनकर (वय ४३, रा.अश्वमेध नगर,पेठ रोड, नाशिक) - चोरीचे सोने विकत घेणारा

गुन्हेगारी पार्श्वभूमी :- चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या या संशयितावर भद्रकाली,गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार ४ गुन्हे दाखल आहेत.

१० गुन्ह्यांची कबुली, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सायखेडा,निफाड,दिंडोरी, पिंपळगाव बसवंत,ओझर,वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली.आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली यामहा एफ झेड-एस (Yamaha FZ-S) मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण ४,५६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या