किरण पाटील
गोजातीय प्रजनन व नियमन विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
नाशिक :- पशुवैद्यकीय सेवांची अचूक संख्यात्मक माहिती उपलब्धतेसाठी तसेच राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणाली वर करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पशुसंवर्धन आयुक्त तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी केले.औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात‘गोजातीय प्रजनन व नियमन’या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत पशुंसवर्धन आयुक्त डॉ.पाटील बोलत होते यावेळी उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड,सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.राजू कोलते,यावेळी प्राधिकरणाचे सदस्य डॉ.देवेंद्र जाधव,बायफ पुणे येथील डॉ जयंत खडसे,चितळे-एबीएस जेनस प्रा. लि.चे परीक्षित देशमुख आदी उपस्थित होते.
राज्यात महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे,कृत्रिम रेतन सेवांमध्ये पारदर्शकता वाढविणे तसेच नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगची प्रभावी अंमलबजावणी करणे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.पाटील यांनी‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी’या विषयावर मार्गदर्शन करताना कृत्रिम रेतन सेवा आणि NDLM अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगचे महत्त्व अधोरेखित केले.राज्यात उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यासाठी खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन केले.तसेच या प्रक्रियेत विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,अशी ग्वाही दिली.कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बायफ,पुणे येथील डॉ.जयंत खडसे,यांनी गोजातीय पैदाशीतील संस्थेचे अनुभव मांडले.चितळे-एबीएस जेनस प्रा.लि.चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी‘जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन’या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गोवंशाची उत्पादकता आणि पैदास सुधारण्याविषयी माहिती दिली.भारत पशुधन प्रणालीची उपयुक्तता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते,यांनी उपस्थित खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तांत्रिक सत्रानंतर उपस्थित प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन विविध विषयांवर अभिप्रायांची देवाणघेवाण झाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त तथा प्राधिकरणाचे सदस्य डॉ.देवेंद्र जाधव यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली.डॉ.भड यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या