नाशिक :- कुंभमेळा प्राधिकरणाकडून तंत्रज्ञानाधारित नियोजनाला वेग; पोलीस,महापालिका,जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा एकाच व्यासपीठावर येणार नाशिक,०३ जून २०२६:सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेता गर्दी नियंत्रण,वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत.यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, बुधवारी यासंदर्भात आंतरविभागीय समन्वय बैठक पार पडली.
विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे,नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस स्वामी,नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत नाशिक शहर पोलीस,नाशिक ग्रामीण पोलीस,नाशिक परिक्षेत्र पोलीस,महामार्ग वाहतूक पोलीस,नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर,ईवाय मोबिलिटी टीम,पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो.याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल,वाहतूक नियंत्रण,पार्किंग व्यवस्था,सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले,"सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे तर एकात्मिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे.रिअल टाइम माहिती,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन,सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल.त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे.बैठकीत साधुग्राम नियोजन,घाट व्यवस्थापन,पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन,पोलीस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
0 टिप्पण्या