पोलिसांचे आई-वडिलांचा शोध घेण्याचे आवाहन
नाशिक :- नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओढा रेल्वे स्टेशनवर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ओढा रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या (बोगी कव्हर वॅगन) डब्याला कापडात लटकवलेल्या अवस्थेत एक नवजात मुलीचे अर्भक आढळून आले आहे.याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,त्या चिमुरडीच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,२२ जून २०२६ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास ओढा रेल्वे स्टेशन येथे डाऊन लाईनवर एक मालगाडी उभी होती. रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) आरक्षक योगेश वसंतराव गवाड,(वय ४२) हे शासकीय कर्तव्यावर असताना,त्यांना मुंबई साईड कडून १२ व्या किंवा १३ व्या डब्याला गुलाबी,हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये काहीतरी लटकवलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता, त्यात एक नवजात जिवंत मुलगी असल्याचे आढळून आले.आरक्षक गवाड, यांनी तातडीने वरिष्ठ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने या नवजात बालिकेला उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS-2023) च्या कलम ९३ अन्वये नवजात शिशुचा परित्याग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन:
या नवजात मुलीच्या आई-वडिलांचा किंवा तिची देखभाल करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.या घटनेबाबत किंवा संबंधित व्यक्तींबाबत काहीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक सचिन बनकर, यांनी केले आहे:
स.पो.नि. सचिन बनकर: 8888866978
स.पो.उपनि. उफाडे: 9823478555
पो.हवा. शैलेंद्र पाटील: 7720008520
पो.हवा. सचिन देवे: 9967249475
0 टिप्पण्या