नाशिक :- स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सातपूर, नाशिक येथे ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २२ मे २०२६ पासून सुरू झाली आहे.दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर.एस.मुंडासे यांनी केले आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेत अभियांत्रिकी व बिगर-अभियांत्रिकी क्षेत्रातील एक व दोन वर्ष कालावधीचे विविध व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.मोटर मेकॅनिक,डिझेल मेकॅनिक,पंप ऑपरेटर कम मेकॅनिक,टर्नर, मशिनिस्ट,मशिनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, ऑपरेटर अॅडव्हान्स मशीन टूल्स, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, फाउंड्रीमॅन, टूल अँड डायमेकर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग,वेल्डर,फिटर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, वायरमन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,प्लंबर,गवंडी,सुतारकाम, पेंटर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA),आयसीटी सिस्टिम मेंटेनन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT),स्टेनोग्राफर आणि सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी) यासह विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
संस्थेत अनुभवी प्रशिक्षक, अत्याधुनिक यंत्रसामग्री,सुसज्ज कार्यशाळा,संगणक प्रयोगशाळा व उद्योगाभिमुख प्रशिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध होत आहे.जागतिक बँक सहाय्यित‘स्ट्राइव्ह’योजनेअंतर्गत ॲरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्वीपमेंट फिटर हा विमाननिर्मिती उद्योगाशी संबंधित आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.तसेच केंद्र शासनाच्या मॉडेल आयटीआय योजनेअंतर्गत Internet of Things (IoT) हा नवयुगीन अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी संस्थेत ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) राबविले जाते. याअंतर्गत प्रशिक्षणार्थींना नामांकित उद्योग व कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो.तसेच POTS योजनेद्वारे विविध उत्पादनांची निर्मिती व विक्री केली जाते. इलेक्ट्रिशियन, वायरमन,प्लंबर आदी व्यवसायांमार्फत अल्प दरात दुरुस्ती व देखभाल सेवा देखील उपलब्ध करून दिली जाते.
संस्थेमध्ये जागतिक दर्जाच्या कार्यशाळा, डिजिटल लायब्ररी, दरमहा रुपये ५०० विद्यावेतन, बस व रेल्वे पास सुविधा तसेच आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता (रूपये 5००) दिला जातो. प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रप्रदर्शने,जागतिक कौशल्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,विज्ञान दिन,महिला दिन, पर्यावरण दिन व रक्तदान शिबिरांसारखे विविध उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेत दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू व रोजगार मेळावे आयोजित केले जातात. सिमेन्स, टाटा मोटर्स, क्रॉम्टन ग्रीव्हज्, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा,बॉश,एच.ए.एल, अेबीबी,व्हि.आय.पी यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड होते. सर्व व्यवसायांसाठी १०० टक्के शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) योजना राबविली जाते. तसेच उद्योजकता विकास,नवोपक्रम (Innovation) आणि बौद्धिक संपदा संवर्धनासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते.
औद्योगिक क्षेत्रात कुशल तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर मागणी असून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगार,स्वयंरोजगार आणि शिकाऊ उमेदवारीच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत.प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून उपलब्ध वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.अधिक माहितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सातपूर,नाशिक येथे संपर्क साधावा,असे आवाहनही उपसंचालक मुंडासे,यांनी केले आहे.
0 टिप्पण्या