पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत
नाशिक :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १५ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव,विमाप्र तसेच दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.इच्छुक व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत अर्ज भरून त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गृहप्रमुख अथवा गृहपाल यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण,नाशिकचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जुलै २०२६ असून इयत्ता ११वी,१२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ अशी आहे.
तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात येते.पात्र विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नवीन नियमानुसार प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वाधार योजनेचा अर्ज सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यासच स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येणार आहे.जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना वसतिगृह तसेच स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही.ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही,तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या नियमामध्ये शिथिलता देण्यात आली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चालू शैक्षणिक वर्षातच वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा. वसतिगृहातील प्रवर्गनिहाय रिक्त जागा तसेच अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख, गृहपाल अथवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त नांदगावकर,यांनी केले आहे.
0 टिप्पण्या