खळबळजनक कारवाई; हजारोंची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात!

नंदुरबारमध्ये खळबळजनक कारवाई; १७ हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात!

नंदुरबार :- कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे १७ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कोंढावळ बिट येथील महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे,(पाटील) यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. आज ९ जून २०२६ रोजी 'फेस फाटा' (शहादा ते शिरपूर रस्ता) येथे हा यशस्वी सापळा रचण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ग्रामपंचायत हद्दीतील शेतीच्या बांधावरील आणि माळरानावरील काटेरी बाभळीची झाडे कायदेशीर परवानगीने तोडून ती 'टाटा मॅजिक' वाहनाने विक्रीसाठी गुजरात राज्यात घेऊन जात असत.माहे मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान त्यांनी अनेकदा अशी वाहतूक केली होती.या वाहतुकीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात (बक्षीस म्हणून) वर्ग-३ च्या महिला वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी १७,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा यशस्वी सापळा:
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.एसीबीच्या पथकाने फेस फाटा येथे सापळा रचला.तक्रारदाराकडून १७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच महिला वनरक्षकाला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी सारंखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक:
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनील दोरगे,यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत चिमणराव भरते,पोलीस निरीक्षक विकास लोंढे,विलास पाटील,नरेंद्र पाटील, विजय ठाकरे,जितेंद्र महाले,संदीप खंडारे,आणि रेश्मा परदेशी,(धुळे) यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास लोंढे,करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या