नाशिक :- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-3) गवळाने फाटा ते डोंगर बाबा दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे.१ जून २०२६ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील,यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गंभीर अपघात
गवळाना फाटा ते डोंगर बाबा परिसरात पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मुख्य महामार्गावरील वाहतूक सर्विस रोडवर वळवण्यात आली आहे.मात्र,या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सुरक्षा बॅरिकेड्स, दिशादर्शक किंवा इशारा फलक लावण्यात आलेले नाहीत.रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्ता समजण्यासाठी आवश्यक प्रकाश व्यवस्था (लाईट्स) आणि वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक मार्शलची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे १ जून रोजी रात्री १० च्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र आणि गंभीर अपघात झाला,ज्यामध्ये दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.स्पीड ब्रेकर आणि उपाययोजनांची मागणी
डोंगर बाबा परिसराच्या मागील बाजूस वाहने अत्यंत वेगाने धावत असल्याने येथे तातडीने स्पीड ब्रेकर उभारणे गरजेचे आहे.यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून, प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर नागरिकांचे जीव वाचले असते,अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.मंजूर अंदाजपत्रक आणि नियमांनुसार ठेकेदाराने सुरक्षा पुरवणे बंधनकारक असतानाही नियमांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.पत्राद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
नियमांनुसार तातडीने मजबूत सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्यात यावेत.
रात्रीच्या सुरक्षेसाठी परावर्तित (Reflective) इशारा फलक आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी.वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात ट्रॅफिक मार्शल नेमण्यात यावेत.डोंगर बाबा परिसराच्या मागील बाजूस वाहनांचा वेग कमी करण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत.भविष्यातील अपघात टाळण्यासाठी संपूर्ण परिसराचा व्यापक सुरक्षा आराखडा (Safety Plan) तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.हा विषय नागरिकांच्या जिवाशी संबंधित असून प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास पुढील गंभीर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असेल,असा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या